तर मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामाही देईल; सत्ताधारी आमदाराची मोठी घोषणा
30 तारखेला माझ्या घरावर जाळपोळ झाली. दगडफेक झाली. जाळपोळ करणारी माणसे कोण आहेत, त्याचा सीसीटिव्ही पुरावा म्हणून मी पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी त्याचा तपास करावा. वीस बावीस नाव घेत पोलिसांनी इतर पाच हजार आरोपी केले आहेत. पोलिसांनी खऱ्या आरोपींवर कारवाई केली पाहिजे. जे यात सहभागी नाहीत, त्यांना पोलिसांनी सोडून द्यावे. पोलीस पैशासाठी अनेकांना आरोपी करत असल्याची माहिती मला मिळत आहेत. जे तरुण निर्दोष आहेत त्यांनी फरार होवू नये. त्यांनी पोलिसांसमोर बाजू मांडावी, असं आवाहन आमदार प्रकाश सोळंके यांनी केलं.
महेंद्र मुधोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड | 10 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणाला माझा कधीही विरोध नव्हता. मराठा आरक्षणाला मी जाहीर पाठिंबा देतो. मराठा आरक्षणासाठी वेळ आली तर मी आमदारकीचा राजीनामाही देईन, अशी घोषणाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. बीडच्या माजलगावमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाश सोळंके यांनी ही घोषणा केली. त्यामुळे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबूराव पोटभरे यांनी मराठा आरक्षण अधिकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार प्रकाश सोळंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच सोळंके यांनी जाहीर कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी या सभेला संबोधित करतानाच प्रकाश सोळंके यांनी ही घोषणा केली. सध्या उभ्या महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती बिकट आहे. एकत्रित पारंपरिक कुटुंब पद्धती राहिली नाही. जमीन तेवढीच आहे, कुटुंब वाढले आहे. गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आर्थिक साधन निर्माण झाले पाहिजे. त्यामुळे आरक्षणाची मागणी रास्त आहे, असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं आहे.
प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग खुला
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, तसेच समाजाची नोंद कुणबी म्हणून करावी ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे. त्यांच्या आंदोलनामुळेच कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा रस्ता खुला झाला आहे, असं सोळंके म्हणाले.
आधीच आरक्षण मिळाले असते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायाच्या पायाची शपथ घेवून आरक्षण देण्याचे आश्वासन दिलं आहे. सरकार समोर पेच आहे, कायद्यात टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी त्रुटी दूर करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. 35 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. 60 वर्षात कोणत्याही सरकारने या नोंदी का तपासल्या नाहीत. अन्यथा आधीच आरक्षण मिळाले असते, असं सांगतानाच मराठ्यांना लोकसंख्येनुसार आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
तोच निवडून येईल
दरम्यान, बाबूराव पोटभरे यांनीही यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्याचे वातावरण बिघडत आहे म्हणून माजलगावमध्ये मराठा आरक्षण परिषद ठेवण्यात आली आहे. या परिषदेत सर्वच जाती धर्माचे लोक उपस्थित होते. माजलगावची ही पहिली परिषद आहे, आता याच परिषदा राज्यभर राबविणार आहोत. आरक्षणाबाबतची जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे. जो कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडेल तोच आगामी निवडणुकात आमदार किंवा खासदार म्हणून निवडून येईल, असं सांगतानाच मनोज जरांगे पाटील यांचं आंबेडकरी आणि मुस्लिम – ओबीसी समाजाकडून जंगी स्वागत करण्यात येणार आहे, असं बाबूराव पोटभरे यांनी म्हटलंय.