Weather Alert: हुश्श… ‘जवाद’ चक्रीवादळाने दिशा बदलली, महाराष्ट्राचा धोका टळला, पूर्वोत्तर राज्यांवर प्रभाव जाणवणार
दिनांक 17 व 18 ऑक्टोबर दरम्यान पुर्वोत्तर, मध्य भारतातील अनेक राज्यांत पावसाचे आगमन होईल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.
औरंगाबाद: मागील आठवड्यातील भारतीय उपखंडात सुरु असलेल्या हवामानातील बदलांनुसार येत्या 16,17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘जवाद’ चक्री वादळाचा (Jawad cyclone) तडाखा बसणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. मात्र मागील चार दिवसात चक्रीवादळाची दिशा बदलली असल्याने या तडाख्यातून महाराष्ट्राची सुटका झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही परतीच्या पावसाचा धिंगाणा सुरुच आहे.
पूर्वीचा अंदाज काय होता?
हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळ किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पुढील पाच सहा दिवसात या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता होती. याचा फटका 14 ऑक्टोबरदरम्यान आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगडला बसणार होता. तर महाराष्ट्रातील विदर्भ व पूर्व मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस 16 आणि 17 ऑक्टोबर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
आता वादळ भारताच्या उत्तर पूर्वेच्या दिशेने…
दक्षिण चीन समुद्रातून ‘काम्पसु’ या उष्णकटिबंधीय वादळाची निर्मीती होताना दिसत आहे, दिनांक 11ऑक्टोबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे व पुढील 24 तासांमध्ये ही प्रणाली अधिक प्रभावी होईल. त्याचा मार्ग व्हिएतनाम, लाओस आणि थायलंड असा राहील असे दिसतो आहे. दिनांक 16 ऑक्टोबर पर्यंत याचा प्रभाव दिसतो आहे. यामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेली बाष्प व कमी दाबाचे क्षेत्र आणखी पूर्व दिशेला खेचले जाईल. यावेळेस त्याची तीव्रता जास्त धोकादायक असेल आणि परावर्तित परिणाम म्हणून दिनांक 17 व 18 ऑक्टोबर दरम्यान पुर्वोत्तर, मध्य भारतातील अनेक राज्यांत पावसाचे आगमन होईल असे दिसते आहे, असे स्पष्टीकरण हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिले.
मान्सून परतीचा वेग जास्त, थंडीचे लवकरच आगमन
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मान्सूनने फार लवकरच आपला परतीचा प्रवास पूर्ण केलेला दिसतो आहे. उत्तर भारतात असलेल्या पर्वतीय रांगावर व राजस्थानच्या वाळवंटात अतिशय थंड असणारे ध्रुवीय वारे वेळेआधीच दाखल झाल्याने पर्वतीय भागात बर्फवृष्टी एक महिना आधी सुरू झाली तर उत्तर भारतात पठारी प्रदेशात थंडीने आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही येत्या काही दिवसात थंडीचे आगमन होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाचे थैमान
नाशिकसह 12 जिल्ह्यात पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः कोकणात पावसाची जोरधार अधिक असणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे द्राक्षबागा, कांदा, सोयाबीनचा चिखल झाला आहे. त्यातच आज सोमवारपासून राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या काळात पुढील दोन दिवसांसाठी नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
इतर बातम्या-
Weather: धुक्यात हरवले औरंगाबाद, थंडीचे संकेत, येत्या दोन दिवसात राज्यातून परतीच्या पावसाची एक्झिट!