औरंगाबाद: जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात आली असली तरीही त्या सर्व ठिकाणी कोरोनासंबंधी नियमांचे पालन करण्याचे आदेश औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. 06 ऑक्टोबर 2021 रोजी हे आदेश काढण्यात आले होते. मात्र या आदेशात आणखी सुधारणा करत जिल्ह्यातील पाच प्रमुख पर्यटन स्थळेही (Aurangabad tourism) नियमित वेळेत आणि सर्वांसाठी खुली करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी (Aurangabad District Collector) स्पष्ट केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 10 ऑक्टोबर पासून केली जाणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या नियमानुसार ही पर्यटनस्थळे सर्वांसाठी, सर्व वयोगटातील लोकांसाठी खुली राहणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने 06 ऑक्टोबर रोजी ब्रेक द चेन अंतर्गत आदेश काढले होते. यात 65 वर्षावरील वृद्ध आणि 10 वर्षाखालील मुलांना धार्मिक स्थळांवर येण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. या वयोगटातील लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. याचा परिणाम जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरही होण्याची शक्यता होती. त्यामुळे पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी एक पत्र लिहिले. या पत्रात जिल्ह्यातील पाच प्रमुख पर्यटन स्थळे नियमित वेळेत सुरु ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारीत आदेश काढला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, औरंगाबादमधील बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी आणि दौलताबाद आदी पर्यटनस्थळे सुर्योदय ते सूर्यास्तापर्यंत चालू ठेवण्याची परवानगी आहे. सर्व वयोगटातील पर्यटकांसाठी ही स्थळे खुली राहतील. मात्र या ठिकाणी आल्यावर कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. 10 ऑक्टोबरपासून या आदेशाची अंमलबजावणी होईल, असे या आदेशात म्हटले आहे.
खुलताबादेतील हजरत जर जरी जर बक्ष यांचा ऊरूस सोमवारपासून सुरु होत आहे. कोरोनाच्या नियमांनुसार, यंदा ऊरुसात फक्त दर्शनाची परवानगी आहे. येथे प्रसाद किंवा दुकाने वा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. ऊरूसासंबंधी निर्णयाकरिता देशमुख यांनी नुकतीच नगरपरिषद सभागृहात दरगाह कमिटी सदस्यांसह, सर्व कार्यालयीन प्रमुखांची आढावा बैठक घेतली.
इतर बातम्या-
औरंगाबादचा वाचनवेलू थेट जम्मूपर्यंत, ‘मोहल्ला बालवाचनालया’च्या 21 शाखा, जळगाव, पुण्यातही केंद्र
देवीच्या रुपाने गोलंग्री शाळेत आल्या वनमालाताई, पदरचे 15 लाख खर्च करुन पालटले माहेरच्या शाळेचे रुप