Manoj Jarange Patil : आत काही तरी शिजतंय? मुख्यमंत्र्यांना कोण आडवतंय?; मनोज जरांगे पाटील यांचा सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मी उपोषण करणारच आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे. आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण आमच्याही लेकराबाळांचा प्रश्न आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 25 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी आपण आमरण उपोषणावर ठाम असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली त्याचा आम्ही आदर करतो. त्यांचा सन्मान करतो. पण आमच्याही लेकराबाळांचा प्रश्न आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? आत काय शिजतंय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणस्थळी जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यावर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी शपथ घेतली. आम्ही त्यांचा सन्मान करतो. तोंडापुरतं बोलत नाही. ते चांगले आहेत. त्यांना कोण आरक्षण देण्यापासून आडवतंय हे आम्हाला शोधावं लागेल. आज दिवस भर शोधावे लागले. आमच्या अशाच पिढ्या जाणार का शोधायला? त्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला तर ते पाळतात हे त्यांची ख्याती आहे. त्यांनी शपथ घेतली. त्याचं कौतुक आहे. आदर आहे. पण आमच्या लेकराबाळांचाही प्रश्न आहे. त्यामुळे थांबणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
त्यांना आरक्षण कसं दिलं?
जे टिकणारच नाही ते आरक्षण दिल्यावर ते उच्च न्यायालयात टिकणारच नाही. बाकीच्या लोकांना कशातून आरक्षण दिलं? त्या निकषात मराठे बसत नाही का? मग काय अडचण आहे? कशाला वारंवार तुम्ही कारण का सांगता? माळी समाजाचा व्यवसाय काय? विदर्भातील कुणबी समाजाचा व्यवसाय काय? त्यांना आरक्षण दिलं, ते कसं दिलं? त्यांनी किती कागदपत्र दिली? त्यांना आरक्षण देण्यासाठी तुम्ही किती समित्या नेमल्या? असे सवालच जरांगे पाटील यांनी उपस्थित केले.
काही तरी शिजतंय
आम्ही आरक्षण देण्यासाठी 40 दिवस दिले होते. आज 41 वा दिवस आहे. काहीच निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? कारण काय आहे? त्याचा शोध घेतला पाहिजे. अडचण असल्याशिवाय, मुख्यमंत्र्यांची तळमळ पाहता काही तरी गडबड आहे. काही तरी आत शिजतंय. नाही तर त्यांनी शपथ घेतली नसती. 40 दिवस घेतले नसते. विरोध करणारे कोणी तरी आत आहे. आम्ही शोधलेतही, असा दावा त्यांनी केला.