दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजी नगर | 11 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केल्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी जनजागृती सुरू केली आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्याकडे आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ मागितला. तर जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. 24 तारखेला ही डेडलाईन संपणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी 14 ऑक्टोबरलाच मराठा समाजातील कार्यकर्त्यांना जालन्यातील अंतरवली सराटीत येण्याचं आवाहन केलं आहे. जरांगे पाटील हे आरपारची लढाई करण्याच्या तयारीत आहेत. 14 ऑक्टोबर रोजी अंतरवलीत होणाऱ्या सभेतून ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर राज्यभर दौरा सुरू केला आहे. मराठा समाजामध्ये ते जनजागृती करत आहेत. आरक्षणाचं महत्त्व समजावून सांगत आहे. तसेच आंदोलन करताना संयम बाळगण्याचं आवाहनही करत आहेत. जाळपोळ, हिंसा अशा गोष्टी करू नका, शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला ही लढाई लढायची आहे, असं जरांगे पाटील सांगत आहेत. काल ते बुलढाण्यात होते. त्यानंतर रात्री संभाजीनगरात आले होते. छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय क्रीडा संकुल कार्यालयामध्ये त्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी संभाजीनगरच्या नागरिकांना अंतरवलीला येण्याचं आवाहन केलं.
मी इतके निर्दयी सरकार आजपर्यंत पाहिले नाही. ज्यात मराठा समाजाचे हित नाही तो कायदा आम्हाला मान्य नाही. जीवंत आहे तोपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. समाजावरील अन्याय आता सहन होत नाही. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढत राहील, असं जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं.
सरकारने 30 दिवसांचा वेळ मागितला होता. 14 ऑक्टोबर रोजी ही डेडलाईन संपत आहे. पण आपण त्यांना आणखी 10 दिवस वाढवून दिले आहेत. त्यामुळे 24 तारखेला सरकार आपली भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे येत्या 14 तारखेला अंतरवली येथे मोठी सभा ठेवण्यात आलेली आहे. त्या सभेला सर्व समाजातील नागरिकांनी यायचं आहे .घरी कोणी थांबायचं नाही. जास्तीत जास्त संख्येने या. एक दिवस काम बुडवल्याने मराठा समाजाचा जर भलं होत असेल तर सर्वांनी एक दिवसाचं काम बुडून अंतरवलीला या, असं आवाहन त्यांनी केलं.
यावेळी त्यांनी समाजातील तरुणांना आंदोलन करण्याचं आवाहन केलं. आंदोलन करा, पण उग्र आंदोलन करू नका. जाळपोळ करू नका. मराठा समाजातील तरुणांना शिकून पुढे जायचं आहे. त्यामुळे अंगावर गुन्हे येईल असे आंदोलन करू नका. तसेच आरक्षण मिळत नाही म्हणून निराश होऊ नका. आत्महत्या करू नका. मी त्या होऊ देणार नाही. तुमच्या बळावरच हा लढा लढायचं आहे. तुम्ही जर आत्महत्या केल्या तर आरक्षण द्यायचं कुणाला? असा सवाल त्यांनी केला.
जातिवंत मराठ्यांची एकजूट पाहून मी भारावून गेलो आहे. आता थांबायचे नाही. एक टक्यामुळे घरात बसलेल्या तरुणांच्या आई वडिलांना त्यांचं दुःख माहीत आहे. आता हे शेवटचं आंदोलन आहे. सरकारने एक महिन्याची वेळ मागितली हीच मराठ्यांना मोठी संधी आहे. सरकारने दिलेल्या वेळेत आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.