संभाजीनगर | 17 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात जाऊन मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना मुंबईत किंवा संभाजीनगरात चांगल्या दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यास सांगितलं. इतके दिवस उपोषण केलंय. उपचार घ्या. तुमची प्रकृती ठिक नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. मात्र, आज तीन दिवसानंतर अचानक जरांगे पाटील यांना जालन्याहून थेट संभाजीनगरला नेण्यात आलं आहे. रुग्णवाहिकेतून त्यांना संभाजीनगरला नेण्यात आलं असून त्यांची प्रकृती ठिक नसल्याचं सांगितलं जात आहे.
मनोज जरांगे यांनी 17 दिवस उपोषण केल्यानंतर त्यांची तब्येत खालावली आहे. उपोषणस्थळी काही उपचार घेतल्यानंतर आता त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांच्या चाचण्या होतील आणि उपचार दिले जातील. उपचार घेण्यासंदर्भात मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. उपचार घेतल्यानंतर परत मी उपोषण स्थळी जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
जरांगे पाटील यांची तब्येत आज अधिकच खालावली. त्यांना अशक्तपणा वाटू लागला. त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिका आणून जरांगे पाटील यांना संभाजीनगरला आणण्यात आलं. गॅलेक्सी रुग्णालयाजवळ रुग्णवाहिका येताच रुग्णवाहिकेला शेकडो मराठा आंदोलकांनी गराडा घातला. यावेळी जरांगे पाटील यांच्या नावाने घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी जरांगे पाटील यांनी रुग्णवाहिकेतूनच आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी माईकचीही व्यवस्था करण्यात आली होती.
तुम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी हटणार नाही. तोपर्यंत माझी जागा सोडणार नाही. मेलो तरी बेहत्तर. तपासण्या करण्यासाठी आलो आहे. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. त्यामुळे मी इथे आलो आहे. फक्त तपासण्या सुरू आहेत. त्या झाल्या की पुन्हा जागेवर जातो. तुमच्या पाया पडून सांगतो शांततेत आंदोलन करा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी सांगितलं.
17 दिवस उपोषण झालं. शरीराच्या तपासण्या करणं आवश्यक होत्या. तसं जिल्हा प्रशासन आणि सरकारचं म्हणणं होतं. समाजाचंही म्हणणं होतं. त्यामुळे गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलो. तपासण्या झाल्या की आंदोलन ठिकाणी येणार आहे. मी आंदोलन बंद करणार नाही, असंही त्यांनी स्पष्टच सांगून टाकलं.
डॉक्टर विनोद चावरे हे जरांगे पाटील यांच्यावर उपचार करत आहेत. जरांगे यांचा बीपी 110/70 आहे. शुगर 101 आहे. त्यांच्या रक्त आणि लघवीचे नमुने घेतले जाणार आहेत. रिपोर्ट चांगले आले तर ठिक नाही तर दाखल करून घेण्यात येईल, अशी माहिजी डॉक्टर विनोद चावरे यांनी दिली.