Manoj Jarange Patil Health Update : लई सलाईन लावल्या, आता नसा सापडत नाहीत; मनोज जरांगे यांची तब्येत आता कशी?
काही लोकांनी पैसे घेतल्याचं माझ्या कानावर आलं. कुणी माझ्या नावाने पैसे घेतले असतील तर मला सांगा. समाजाच्या जीवावर कुणी पैसे उकळत असेल तर चूक आहे. माझ्यापर्यंत पैसे घेतलेल्यांची नावे आली नाही. आल्यावर मी ती उघड करेल. मला फक्त पैसे घेतल्याचं कानावर आलं. नक्की घेतले की नाही माहीत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी काल उपोषण सोडलं आहे. मात्र, उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अशक्तपणा जाणवल्याने त्यांना सलाईन लावण्यात आल्या आहेत. त्यांना बोलताना थोडा दम लागतो. पण एकूण त्यांची प्रकृती ठिक आहे. सध्या माझी तब्येत ठिक आहे. रुग्णालयातून सुटका झाल्यावर मी तडक घराकडे जाणार आहे. घरी गेलो म्हणजे माझं आंदोलन संपलं असं नाही. मी गावाला डोंगरावर राहून आंदोलन करेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
माझी तब्येत सध्या ठिक आहे. तूर्तास आता उपोषण नाही. मला उठता येईना, तोंड धुता येईना. त्यांनी लई सलाईन लावल्या. आता नसा सापडत नाहीत. पुढच्या वेळी डोंगरावर उपोषण करणार आहे. आम्हाला त्रास झाला असं कोणी म्हणता कामा नये. गावालाच राहीन. पण डोंगरावरून उपोषण करून समाजाला न्याय देईन, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
डोंगरात आंदोलन करणार
मी आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. मी घरी जाणार असेल तर त्यात काय लबाडी आहे? शहागड येथे आम्हाला कार्यालय घ्यावं लागणार आहे. अंतरवली सोडायचा विषय नाही. लोकांना त्रास होऊ नये, वर्दळ होईल म्हणून शहागड येथे कार्यालय घेणार असल्याचं सांगितलं. अंतरवली गावाचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आजपासूनच आम्ही राज्यपातळीवरचं काम सुरू करणार आहोत. मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
तर रणनीती वेगळीच असेल
आंदोलनाचं ठिकाण हे अंतरवलीच असेल. पण शहागडमध्ये लोकांच्या समस्या सोडवल्या जातील. म्हणून शहागडला आम्ही कार्यालय घेणार आहोत. त्यामुळे समाजाच्या लोकांना हक्काचं ठिकाण मिळणार आहे, असं सांगतानाच आम्हाला कुणीही आरक्षण द्या. कुठंही द्या. पण आरक्षण नाही दिलं तर आमची पुढची रणनीती वेगळी असणार आहे, असा इशाराच त्यांनी दिला.