सरकारला बळी घ्यायचा तर घेऊ द्या…; अश्रू… अश्रू… आणि अश्रू… मनोज जरांगे यांना बोलताही येईना
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांनी बोलताही येत नाहीये. स्टेजवर उभं राहताना जरांगे पाटील कोसळले आणि आंदोलकांनी एकच गलका केला. पाटील पाणी प्या... पाणी प्या... पाणी प्या... अशा घोषणा सुरू झाल्या. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि मी घोटभर पाणी घेतो असं त्यांनी जाहीर केलं.
जालना | 30 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. पोटात अन्न आणि पाण्याचा कण नसल्याने त्यांची प्रकृती ढासळली आहे. स्टेजवर उभं राहत असताना ते कोसळले. त्यामुळे आंदोलकांनी पाटील पाणी प्या… पाणी प्या… तुम्हाला पाणी प्यावंच लागेल… अशी विनवणी सुरू केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अशाही अवस्थेत आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताही येत नव्हतं. डोळ्यात फक्त अश्रू आणि अश्रू होते. मध्येमध्ये डोळे पुसत होते. सरकारला बळी घ्यायचा तर घेऊ द्या… समाजाचं भलं होत असेल तर मी मृत्यूलाही सामोरे जाईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
प्रत्येकाने मी पाणी प्यावं असाच हट्ट केला तर आरक्षण कसं मिळेल. तुमची माया कळते. मी पाणी प्यायलं पाहिजे. पण जर आपण पाणी प्यायलो तर आपल्या लेकरांना कसा न्याय मिळेल? मी या समाजाला मायबाप मानतो हे खरं आहे. मी समाजाच्या पुढे जात नाही. पण तुम्ही असाच हट्ट धरत राहिले तर आपली जात खूप अन्याय सहन करते न्याय कसा मिळेल. सरकारला एकाचा बळी घ्यायचा तर घेऊ द्या. तुम्ही असा हट्ट धरला तर कसं होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
अन्याय केला जातोय
आपल्या मराठ्याच्या लेकरांवर जाणूनबुजून अन्याय केला जातो. मग आपल्याला आपल्या लेकराला न्याय द्यायची एवढी संधी आहे. आपल्या कोट्ट्यवधी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि आरक्षण देण्यासाठी एकाच्या जीवाचं काही झालं तरी चालतं. पण सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्या भावनेतून मी बसलो आहे. समाजाला न्याय मिळायचा दिवस जवळ आला आहे. मला तुमची माया कळते. खरं आहे. तुम्ही हात जोडले आणि रडायला लागले, पाणी प्या म्हणून तुम्ही जर हात जोडत राहिले तर लेकरांना न्याय कसा मिळेल? असा सवाल त्यांनी केला.
घोटभर पाणी घेईल
मला वाटतं मी माझ्या समाजाचा कधीच शब्द डावलत नाही. डावलत नाही. मला या समाजापेक्षा कोणी मोठं नाही. तुम्ही हट्ट करू नये, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्यावेळी एकच गलका झाला. पाटील तुम्ही पाणी प्या… पाणी प्या… असा आग्रह सर्वांनी धरला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपण पाण्याचा घोट घ्यायला तयार असल्याचं सांगितलं.
थोडा म्हणजे किती?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारला थोडा अवधी द्या असं आवाहन केलं. त्यावर थोडा म्हणजे किती? मुख्यमंत्र्यांना तुम्हीच विचारा. किती अवधी द्यायचा? थोडा म्हणजे 50 वर्ष का? असा सवाल त्यांनी केला.