संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 28 जानेवारी 2024 : सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीत आले आहेत. या अभूतपूर्व यशानंतर मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाची सांगता करतील असं सांगितलं जात होतं. पण जरांगे पाटील यांनी अंतरवलीत समाजाची सभा घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या बाजूने कायदा झाला असला तरी आपल्याला हे आंदोलन सुरूच ठेवायचं असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. हे आंदोलन सुरू ठेवण्याबाबत त्यांनी समाजाचीही संमती घेतली आहे. तसेच आंदोलन सुरू ठेवण्यामागची कारण मिमांसाही केली आहे.
मनोज जरांगे पाटील काल मध्यरात्री अंतरवली सराटीत आले होते. यावेळी त्यांचं ढोलताशे वाजवून स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आज दुपारी त्यांनी समाजाची एक सभा बोलावली. यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद साधला. तसेच नव्या अध्यादेशाचं महत्त्वं सांगतानाच आंदोलन सुरू ठेवायचं की नाही याबाबतची चर्चाही समाजासोबत केली. यावेळी त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्यामागची त्यांची भूमिका मांडली. त्याला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. नव्या अध्यादेशानुसार जोपर्यंत एखाद्या मराठा समाजाच्या नोंदी नसलेल्या सोयऱ्याला कुणबीप्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन यशस्वी झालं आणि नव्या कायद्याची अंमलबजावणी झाली असं म्हणता येत नाही. त्यामुळे नोंदी नसलेल्या सोयऱ्याला एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवलं पाहिजे, असं मत जरांगे यांनी व्यक्त केलं आणि त्याला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. त्यामुळे जरांगे यांचं आंदोलन अजूनही सुरूच राहणार आहे.
सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा सरकारने काल अध्यादेश काढला. ज्याची कुणबी म्हणून नोंद मिळाली आहे, त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला त्या कागदपत्राच्या अंतर्गत एक तरी प्रमाणपत्र मिळायला हवं. हे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं. कायदा पास झाला तो नुसता कायदा राहू नये. सगेसोयऱ्यांचा कायदा पास झाला पण फायदाच नाही झाला तर फायदा काय? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
गाफिल राहिलं तर आंदोलन फसतं. आपण सावध आहोत. एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय होत नाही. सरकारने कायदा केला. त्यांचं कौतुक केलं. पण त्याची अमलबजावणी होईपर्यंत आपण सावध राहायचं आहे. विजय अजून दहा फुटावर आहे. इथूनच विजय झाला का म्हणायचं? दहा फूट पुढं जाऊन पाहू ना. थोडं आणखी पुढे जाऊ. चार पावलं चालावे लागेल. पण खऱ्या विजयाचा आनंद मिळेल ना… आपण लांबूनच का आनंद साजरा करायचा? असा सवालही त्यांनी केला.
म्हणून ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळावा. तरच पुढचा निर्णय घ्या. तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू. आजही आपण तात्पुरतं आंदोलन स्थगित करू शकतो. पण अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवू. सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं तर समजायचं आता सर्वच सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहेत. तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं समजता येईल. कायदा झाला अंमलबजावणी झालीच पाहिजे. हेच आपलं मत आहे. एक प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. त्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ. मंडप आपला आहे, गादी चटाया आपल्या आहेत. भाडंही नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवू, असंही ते म्हणाले.
पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर विजयी कार्यक्रम घेऊ. तोपर्यंत कोणताही विजयी कार्यक्रम घ्यायचा नाही. जो कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे. मुंबईला गेलो कायदा झाला. राज्यभर फिरलो 54 लाख नोंदी मिळाल्या. केवळ मोर्चे काढून ताकद दाखवून ओळख मिळवण्यात मला रस नाही. कोणताही कार्यक्रम घेतल्यावर समाजाचा फायदा झाला पाहिजे यावरच माझा भर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आरक्षण मिळाल्यावर रायगडला जाईल असं म्हटलं होतं. उद्या मी रायगडला जाणार आहे. एक दिवस रायगडला जायला लागेल. 30 जानेवारीला रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.