मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यावर कुठे जाणार?; मनोज जरांगे यांनी काय सांगितलं?
मागास आयोगाचं अहवाल बघितला नाही. तो वाचून सांगतो. आयोगाने जाचक अटी लावण्याचं कारण नाही. मागास ठरण्याचे निकष बदलायला पाहिजे. आयोग अन्याय करणारा असेल तर सगळ्यांना सगळे नियम पाहिजे. नाही तर सगळ्यांना बाहेर काढा. यामुळे मी ते आरक्षण नको म्हणतो. आम्हाला नोंदी मिळतात ते आरक्षण द्या. ओबीसी आरक्षणात आम्ही आरक्षण मिळवणार 24 तारखेला बघाच, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 26 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र ढवळून काढला आहे. उपोषणाचं हत्यार उपसून जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणलं. त्यानंतंर जरांगे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. जरांगे यांच्या सभेला गर्दीचे विक्रम होत आहेत. नेत्यांच्याही सभेला होणार नाही एवढी गर्दी जरांगे पाटील यांच्या सभेला असते. त्यांचा जनाधार पाहता जरांगे पाटील राजकारणात येणार का? अशी चर्चा सुरू आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तर जरांगे यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला आहे. जरांगे यांनी राजकारणात यावं अशी अनेकांची इच्छा आहे. त्यावर स्वत: जरांगे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राजकारणाने आमचा घात केला आहे. आम्ही राजकारणात येणार नाही. जन चळवळीतून आम्ही यश मिळवलं आहे. आंदोलनातून आम्ही न्याय मिळवू. राजकारणाबद्दल आम्हाला चीड आहे. राजकारणामुळे माणूस मतलबी बनतो. जन चळवळीतून गोरगरिबांना न्याय देऊ. राजकारण वाईट गोष्ट आहे तिकडे गेल्यानंतर कोण बिघडेल सांगता येत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सत्तेत नसताना न्याय दिला
मी गोरगरीब मराठा समाजासाठी लढलो. माझा समाज माझ्यावर कधीच अविश्वास करत नाही. मी आंदोलनासाठी 20 जानेवारी तारीख सांगितली. समाजाने लगेच मान्य केली, समाज आता तयारीला लागला आहे. समाजाबद्दल मला एक टक्काही शंका नाही. पण राजकारण नकोच. जन आंदोलनातून मी समाजाला न्याय मिळवू देऊ शकतो. सत्तेत नसताना मी 54 लाख लोकांना न्याय देऊ शकलो. मग सत्तेत जाण्याची गरज नाही, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
तर हिमालयात जाईन
राजकारणापेक्षा मला स्वतःवर जास्त आत्मविश्वास आहे. समाज पाठीशी आहे. समाजाच्या जीवावर प्रश्न सोडवणार नाही. घराणेशाही सामान्य मराठा समाजाने मोडित काढली आहे. समाज अंतिम असतो. समाज मला राजकारणात आणणार असेल तर मग मी हिमालयात जाईन. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मी हिमालयात जाणार आहे. पण राजकारणात येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.