जालना | 14 ऑक्टोबर 2023 : अंतरवली सराटी येथे भगव वादळ आलं आहे. हजारो मराठा बांधव अंतरवली सराटीत एकत्र जमले आहे. आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला आहे. सरकारने आरक्षणासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी दहा दिवस आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी दिले आहेत. त्यापूर्वीच आज मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेऊन सरकारला सज्जड इशारा दिला आहे. तुम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 40 व्या दिवशी काय करणार हे सांगू, असा सूचक इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी भरसभेत सरकारकडे सहा महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेतून सरकार समोर डरकाळी फोडली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आम्हाला महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल. पण एनटी व्हिजेएनटीचा प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार. नाही तर 50 टक्क्याच्यावर घेणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणासाठीची स्थापन करण्यात आलेल्या समितीचं काम बंद करा. चार दिवसात कायदा पारित होणार नाही. एक महिन्याचा काळ द्या असं तुमचं आमचं ठरलं होतं. आता 5 हजार पानांचा पुरावा मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन कुणबी समाजात समावेश करून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्र आणि राज्य सरकारने मराठ्यांचे हाल करू नये. तुम्ही आमचा ओबीसीत समावेश करा. दहा दिवसापेक्षा अधिक काळ वाट पाहण्याची आमची तयारी नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
मराठा समाज एकत्र येत नाही असं म्हणणाऱ्यांच्या मुस्कटात या गर्दीने जोरदार मारलीय. तुम्ही इथे कशाला आला हे सांगा त्यांना. आरक्षणासाठी की आरडाओरडा करण्यासाठी आलाय का हे सांगा, असंही ते म्हणाले.
मुलाच्या हितासाठी आणि नातवाच्या हितासाठी मी या सभेचा साक्षीदार झाल्याची भावना तुमच्या मनात निर्माण झाली असेल. घराघरातून मराठा पेटून उठलाय. मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे, तुमच्या हातात आता दहा दिवस आहे. आज लाखाचा जनसमुदाय अंतरवलीत उसळलाय. त्याचं एकच म्हणणं आहे. राहिलेल्या दहा दिवसात आरक्षण जाहीर करा. आरक्षण नाही दिल तर 40व्या दिवशी सांगू, असा इशाराच त्यांनी दिला.