Manoj Jarange-Patil : तर माझीच अंत्ययात्रा निघेल… मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गर्भित इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. आम्हाला दहा दिवसात आरक्षण द्या. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एकतर विजय यात्रा निघेल नाही तर...
जालना | 14 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सज्जड इशारा दिला आहे. आम्ही 24 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. आता आम्ही माघार घेणार नाही. आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. यापुढे मी टोकाचं उपोषण करेल. आता एक तर आरक्षण मिळाल्याची विजय यात्रा निघेल किंवा माझीच अंत्ययात्रा निघेल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
अंतरवली सराटी येथे आज मराठा समाजाची मोठी सभा पार पडली. या सभेला हजारोंची गर्दी उसळली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार भाषण केलं. मला मरण आलं तरी चालेल पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. माझ्या उंबऱ्यालाही शिवणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
तर जबाबदारी सरकारचीच
24 ऑक्टोबरला आरक्षण दिलं नाही तर 22 ऑक्टोबरला काय करायचं ते सर्वांना सांगितलं जाईल. आंदोलन शांततेत होईल. शांततेच आरक्षण मिळणार हा शब्द आहे. काळजी करू नका. 22 ऑक्टोबरला ला पुढची दिशा ठरवली जाईल. आरक्षण नाही दिलं तर पुढची जबाबदारी सरकारची असेल. पुन्हा तेच सांगतो. आरक्षण दिलं नाही तर पुढची जबाबदारी सरकारचीच असेल. मराठ्यांची नाही. 22 ऑक्टोबरला पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली जाईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
टोकाचं उपोषण करू
आंदोलन शांततेत करायचं. आरक्षण कसं देत नाही ते मराठे पाहतील. अमरण उपोषण करून एक तर माझी अंत्ययात्रा निघेल. नाही तर विजय यात्रा निघेल. आता माघार नाही. 24 ऑक्टोबरच्या आत आरक्षण हवंच. नाही तर टोकाचं उपोषण करू, असा इशाराच त्यांनी दिला.
समित्यांचा घाट बंद करा
राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती पुरावे गोळा करत आहे. समितीला 5 हजार पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता सरकारने समित्यांचा घाट बंद केला पाहिजे. येत्या दहा दिवसात आरक्षण दिलं पाहिजे. तसं आपलं ठरलं होतं. त्यानुसार आता निर्णय घ्या, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.