गाजर दाखवू नका, छगन भुजबळ यांच्या ‘या’ वक्तव्यावर असे का म्हटले जरांगे पाटील
Manoj Jarange | महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावर ठाम असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आता गाजर दाखवू नका, असा इशारा त्यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर | 10 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलनाची धग सरकारला स्वस्त बसू देणार नाही, असं तरी चित्र आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावर ठाम असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांवर त्यांनी लागलीच प्रतिक्रिया व्यक्त केली. आता मराठा समाजाला गाजर दाखवू नका, असा इशाराच त्यांनी दिला. कुणबी नोंदी तपासण्याचे काम अजून जलदगतीने करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. राज्यातील इतर भागात या कामात वेग असला तरी मराठवाड्यात हे काम संथगतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
आमचं आरक्षण गिळलं
मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये 8.5 टक्के आरक्षण मिळू शकतं तर ओबीसी प्रवर्गात केवळ 3.5 टक्के आरक्षण मिळेल. स्वतंत्र आरक्षण मिळालं तर ते पण 7 ते 8 टक्के मिळेल. ओबीसीत मराठा समाजाला फारसा लाभ होणार नाही. त्यामुळे मराठा समाजाने याविषयी विचार करावा, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाचं आरक्षण गिळले आहे. ते मराठा समाज बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसीत मराठा समाजाला काहीही कमी मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
भुजबळांच्या वक्तव्यावर दिली अशी प्रतिक्रिया
छगन भुजबळ यांनी आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करण्याची मागणी केली आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला ओबीसीत घ्या. मग तुम्हाला 75 टक्के काय 90 टक्के आरक्षणाची मर्यादा करा, आम्हाला काही देणे घेणे नाही, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली. 70 टक्के वाढवू, 200 टक्के वाढवू असं गाजर दाखवू नका. अगोदर ओबीसीत समावेश करा आणि काय मर्यादा वाढवायची ती वाढवा, आता गाजर दाखवू नका असा इशारा त्यांनी दिला.
तर भुजबळ साहेबांची फजिती
माळी, मुस्लीम, मरावाडी या जातींपुढे पण कुणबी असल्याच्या नोंदी मिळाल्याचा प्रश्न जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पुन्हा आपला मोर्चा छगन भुजबळ यांच्यावर वळवला. इतक्या जाती कुणबी असतील तर भुजबळ साहेबांची फजिती होईल, असा चिमटा त्यांनी काढला. मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद असताना ही आरक्षण मिळत नाही तर इतर जातींना कधी आरक्षण मिळणार असा टोला त्यांनी लगावला.