मराठा आंदोलकांनी कोणत्या कोणत्या आमदार, मंत्र्यांची वाहने रोखली?; भर रस्त्यात जाब विचारले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं होत आहे. आंदोलकांनी उपोषण सुरू केलं आहे. काही ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंना जोडे मारले जात आहेत. काही ठिकाणी मंत्री, खासदार, आमदारांच्या गाड्या अडवल्या जात आहेत. तर काही ठिकाणी रास्ता रोको केले जात आहे. एसटीवर दगडफेकही सुरू आहे. एकंदरीत राज्यातील मराठा आंदोलन हिंसक होत असल्याचं दिसून येत आहे.
जालना | 29 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा प्राणांतिक उपोषण सुरू केलं आहे. एकीकडे जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. दुसरीकडे नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. कालपासून गावागावात सामूहिक उपोषणं सुरू झाली आहेत. तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आता आमदार, खासदार आणि मंत्र्यांची वाहने अवडण्यास सुरुवात केली आहे. भर रस्त्यात लोकप्रतिनिधींना रोखून जाब विचारला जात आहे. मंत्री, आमदार आणि खासदारांच्या वाहनांसमोर आंदोलक झोपत आहेत. त्यांना जाब विचारत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींची मोठी गोची झाली आहे.
बावनकुळेंच्या कार्यक्रमात घोषणाबाजी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची संकल्प यात्रा सुरू आहे. ही यात्रा डोंबिवलीत आली होती. यावेळी काही मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. मराठा आरक्षण कधी देणार? असा सवाल करत मराठा आंदोलकांनी बावनकुळे यांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणला. यावेळी एक मराठा, लाख मराठाच्या घोषणाही देण्यात आला. बावनकुळे यांनी प्रसंगावधान राखत सर्व आंदोलकांना स्टेजवर बोलावं आणि त्यांच्याशी चर्चा केली.
परत जा, परत जा, विखे पाटील परत जा
नगरमध्ये मराठा आंदोलकांनी उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणकर्त्यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. विखे पाटील यांचा ताफा येताच आंदोलकांनी परत जा, परत जा, विखे पाटील परत जा, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतलं. पण विखेपाटील उपोषणस्थळाजवळ गेले. त्यांनी आंदोलकांची विचारपूस करून त्यांची चर्चा केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
संजय राऊत चले जाव
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आले होते. ते एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळताच मराठा आंदोलकांनी हॉटेलला घेराव घातला. संजय राऊत चले जावच्या घोषणा देण्यात आला. तसेच संजय राऊत हे दौंडमधून गेले नाही तर त्यांना बाहेर पडू देणार नाही, अशा इशारा दिला. तब्बल तासभर आंदोलकांची घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मराठा समाज आक्रमक झाल्याने राऊत यांनी त्यांची बाईक रॅली रद्द केली.
मंडलिक आणि पाटील यांची गाडी अडवली
कोल्हापूरच्या आजरा येथे शिंदे गटाचे खासदार संजय मांडलिक आणि अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील याची गाडी अडवण्यात आली आहे. संतप्त आंदोलकाने गाडी समोर झोपत एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केले.
केसरकर यांचा दौरा रद्द
अहमदनगर शहरातील एन आर लॉन्स येथे प्राथमिक शिक्षक संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार होते. मात्र मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी अहमदनगरचा दौरा रद्द केला आहे. मराठा आंदोलक सभा उधळून लावणार असल्याच्या शक्यतेने केसरकर यांनी मेळाव्याला येणं टाळल्याचं सांगितलं जातं. या मेळाव्याच्या ठिकाणी मराठा आंदोलक घुसले. त्यांनी स्टेजवरील दीपक केसरकर, गिरीश महाजन,यांचे फोटो असलेला फलक हटवण्याची मागणी केली.