Maratha Reservation : डेडलाईनला अवघे दोन दिवस; मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री दगाफटका…
मराठा समाज आत्महत्या करणार नाही. करू नये. आत्महत्या केल्याने न्याय मिळणार नाही. उलट आपलाच एक माणूस कमी होतोय. आपली माणसं वाढली पाहिजे. शक्ती वाढली पाहिजे. ती कमी होता कामा नये. त्यामुळे आपण लढू. पुन्हा सांगतो आपण लढू. लढायचं. समाजाला न्याय द्यायचा आहे.
संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 22 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणासाठी सरकारला देण्यात आलेली मुदत दोन दिवसानंतर संपणार आहे. त्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा एकवटण्यास सुरुवात झाली आहे. आज मनोज जरांगे पाटील हे समाजाशी चर्चा करणार असून पुढील रणनीती ठरवणार आहे. त्यानंतर ते मीडियाशी संवाद साधणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीपूर्वीच जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकार आरक्षण देईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
आरक्षण समितीने दोन महिन्याची मुदतवाढ सरकारकडे मागितल्याचं सांगितलं जात असल्याचं मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आणून दिलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. समितीने काही मागू द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना मुदतवाढ देणार नाही. मुख्यमंत्री मराठा समाजाचा अवमान करणार नाही. मुख्यमंत्र्यांनीच एक महिन्याचा अवधी घेतला होता. दोन महिन्याची मुदत मागू द्या. मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी 30 दिवस मागितले आम्ही 40 दिवस दिले. मुख्यमंत्री दगाफटका करणार नाही, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या पायाला हात लावून सांगतो. बाबा हो, आता आम्हाला 24 तारखेच्या आत आरक्षण द्या, असंही ते म्हणाले.
आरक्षण मिळेल अशी आशा
आम्हाला 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळेल आशा आहे. आम्हाला आरक्षण मिळेल. आम्ही मुख्यमंत्र्यांचा मानसन्मान केला आहे. त्यांना 10 दिवस अधिक दिले आहेत. त्यांनीही समाजाचा मान राखावा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान राखला. सन्मान ठेवला. त्यांनी मान राखावा. गाफिल राहून मराठा समाजाचा अवमान करू नये. आम्ही सावध आहोत. बेसावध नाही. त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं.
तर आरक्षण कुणाला द्यायचं?
मराठा तरुणांकडून आत्महत्या केली जात आहे. त्यामुळे जरांगे पाटील अस्वस्थ झाले आहेत. यावेळी त्यांनी तरुणांना आत्महत्या न करण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे. तुम्ही आत्महत्या करू नका ही महाराष्ट्रातील मराठा तरुणांना हात जोडून विनंती आहे. त्यापेक्षा लढा. तुमचं कुटुंब उघड्यावर पडत आहे. एकानेही आत्महत्या करू नका. आत्महत्या करायची नाही हे तरुणांनी एकमेकांना सांगा. आत्महत्या केली तर आरक्षण कुणाला द्यायचं? असा सवाल त्यांनी केला.
मरायचं नाही, लढायचं…
आत्महत्या केल्याने तुमचं कुटुंब उघडं पडेल. कोणी लक्ष देणार नाही. आईवडील मुलंबाळांकडे कोणी पाहत नाही. आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यांच्या रक्ताचे वंशज आहोत. आपल्याला लढायचं आहे. मरायचं नाही. एकानेही आत्महत्या करायची नाही म्हणजे नाही, असंही त्यांनी सांगितलं.