औरंगाबादः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी काल महाविकास आघाडी सरकारला खुली ऑफर दिली. मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं तर एमआयएम महापालिका निवडणुकीसाठी कुठेही उमेदवार उभा करणार नाही, असे खा. जलील म्हणाले. त्यावर आघाडी सरकारमधील नेते, मंत्री तसेच इतर पक्षांच्या काय प्रतिक्रिया आहेत, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आज औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही एमआयएमच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यांनी फक्त एका वाक्यात उत्तर देणे पसंत केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अत्यंत बेधडकपणे उत्तरे दिली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना आरक्षण दिलं तर निवडणूक न लढवण्याचं एमआयएमनं जाहीर केलंय, याकडे तुम्ही कसं बघता, असा प्रश्न विचारला. तेव्हा राज ठाकरे यांनी उत्तर दिलं, ‘हे कुणी म्हटलंय.. तो कुणाला माहितीच नाही. मुंबईत तर माहितीच नाही. मुंबईतल्या एका पत्रकाराला तर तिथं एमआयएमची सभा होती, हेही माहिती नव्हतं. यावरून तुम्ही काय ठरवायचं ते ठरवा.’
राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर आरक्षणाचा मुद्दा पुढे करत निवडणुका लांबवत असल्याचा आरोप यावेळी केला. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. राज्य सरकार म्हणतंय केंद्रानं आकडेवारी द्यावी, तर केंद्र सरकार म्हणतंय हे राज्याचं काम आहे. केंद्राकडे आकडेवारी असेल तर त्याने ती देणं अपेक्षित आहे. हे दोन्ही सरकार केवळ निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणावरून गोंधळ घालतायत, असा आरोप त्यांनी केला.
इतर बातम्या-