भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गुजरातमध्ये जे ड्रग्स पकडण्यात आलं. त्यातील आरोपी महाराष्ट्रातील होते. त्या आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत, असं गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी भरसभेत या मुंडे आणि आरोपी एकत्र असलेला फोटो दाखवला. तसेच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवून आमदार मनोज कायंदे यांना मंत्री करण्याची जोरदार मागणीही केली. धाराशिव येथील सभेत सुरेश धस बोलत होते.
सुरेश धस यांनी भरसभेत एका वृत्तपत्राची बातमी वाचून दाखवली. ड्रग्स तस्करीची ही बातमी होती. या प्रकऱणात अडकलेल्या आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचा फोटो असल्याचं सांगत धस यांनी भरसभेत हा फोटोही दाखवला. पाकिस्तानातून तस्करी झाली. गुजरातमध्ये 60 कोटींचं 176 किलो ड्रग्स पकडलं. 8 महिन्यापूर्वीची बातमी आहे. महाराष्ट्रातील तीन जणांसह पाच जणांना अटक करण्यात आली. तीन दिवसात 890 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं. पेपरातील बातमी आहे. ड्रग्स म्हणजे इंजेक्शन. 890 कोटीच्या ड्रग्सप्रकरणात कैलास सानप आणि दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटकेत आहेत. गेल्या एक का दीड वर्षापासून हे आरोपी अटकेत आहेत. त्यांचा कुणाबरोबर फोटो? त्यांचा धनंजय मुंडेसोबत फोटो. आका. मेन आका. हा फोटो व्हाटसअपवर टाकतो. करा खुलासे आणि द्या आम्हाला शिव्या, असं सुरेश धस म्हणाले.
हे लोक मला शिव्या देतात. धमक्या देतात. अंजली दमानियानाही धमक्या दिल्या. मला मेसेज आला. तुमच्या टिंब टिंबमध्ये दम आहे का? आता हे कोणत्या मापकाने तपासायचं. मी त्यात जाणार नाही. आमच्यात दम आहे का? आहे ना. म्हणूनच बोलतो ना. दम आहे म्हणूनच एक नाही दोन सांभाळतोय. दोन्हींना तीन लेकरं आहेत. तू नको सांगू म्हणा, असा पलटवारच सुरेश धस यांनी केला.
सारंगी महाजनने काय चूक केली? सारंगी महाजन यांचं ऐका. त्यांचा नवरा कसाही असेल. पण सारंगी महाजन यांचं तरी ऐका. तरीही दादा म्हणतात दुरान्वयेही संबंध नाही. दादा तुम्ही आमचे जावई आहात. सुनेत्रा ताई आमची भगिनी आहे. दादा तुम्हाला सांगतो. त्याला काढाना ना मंत्रिमंडळातून. हा दुपारी मारायला लागला. याला वाचवलं तर तो दिवसाच मारेल. त्याला काढा दादा मंत्रिमंडळातून. मुंडेंच्या जागी मनोज कायंदेला मंत्रिमंडळात संधी द्या. वालू काकाच्या मागे कोण आहे ते पाहा, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी बीडमध्ये गेल्या वर्षी पार पडलेल्या महासंस्कृती कार्यक्रमाचा घोटाळाही चव्हाट्यावर आणला. आकाने महासंस्कृती कार्यक्रम घेतला. सर्व खर्च झाला 10 लाख. मी आज कलेक्टरला विचारलं सरकारच्या तिजोरीतून माल किती काढला. ते म्हणाले, 5 कोटी काढले. सर्व खर्च 10 लाख झाला. 5 दिवस महोत्सव चालला. कुणालाही बोलावलं गेलं. 5 कोटी रुपये खाल्ले. 10 लाख टाका आणि 5 कोटी मिळवा. या महासंस्कृती कार्यक्रमाचं काम मुंबईतील एका एजन्सीला मिळालं होतं. ते काढून वाल्मिकने मिनाज फारुखी नावाच्या माणसाला दिलं. त्या मिनाजचं अकाऊंटही चेक करा म्हणून ईडी आणि सीबीआयला विनंती करणार आहे. परभणी जिल्ह्यातील मिनाज फारुखी आहे. त्याने 5 कोटीचं बिल काढलं. 10 लाख खर्चा. 4 कोटी 90 लाख रुपये जेब में. मग वाल्मिकला ईडीची नोटीस येणार नाही तर काय होणार. 2 फेब्रुवारी 2024 रोजी वाल्मिकला ईडीची नोटीस आली. हा वाल्मिक अण्णाचा प्रताप, असा हल्लाही त्यांनी चढवला.
हा ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद नाही. भांडण नाही. लक्ष्मण हाके साहेब तुमच्या पाया पडतो. आईची शपथ आहे. कुणाचीही उचल घेऊन बोलू नका. उचल हा शब्द वेगळा वाटत असेल तर मागे घेतो. पण कुणाच्या बोलण्यावरून काही करू नका. तुम्हाला फक्त 500 मते पडली. तुम्ही म्हणता ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या पाठीमागे आहे. मग इथं कोण आलंय? हा विषय राजकारणाचा नाही. आम्ही कोणीही असता तरी आम्ही आलो असतो. कैकाड्याच्या पोरालाही मारलं असतं असं तर आम्ही आलो असतो. पण तुम्ही हे धंदे बंद करा, असा इशाराच त्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना दिला.
यावेळी त्यांनी ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनाही कानपिचक्या लगावल्या. शेंडगे साहेब तुमच्या वडिलांनी राज्यासाठी मोठं योगदान दिलं. त्यांनी खूप काम केलं. तुम्हाला 8 हजार 550 मते मिळाली. तरीही तुम्ही म्हणता संपूर्ण ओबीसी समाज तुमच्यापाठी आहे, असा चिमटा त्यांनी काढला.