मी अडाणी..अन् झालो कॅबिनेट मंत्री, पठ्ठ्या राज्यमंत्री पदावरच खूश होता, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांची जबरदस्त फटकेबाजी!

| Updated on: Dec 15, 2021 | 7:00 AM

अस्सल ग्रामीण भाषेतील भाषणबाजीसाठी प्रसिद्ध असलेले शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संदीपान भूमरे यांनी वैजापुरात एका कार्यक्रमाला नुकतीच उपस्थिती लावली. तेथील सभागृहात देखील त्यांनी मंत्रीपदापर्यंत कसा पोहोचलो, तेथे कसे अनुभव आले याविषयी विनोदी शैलीत भाषण करून उपस्थितांची मनं जिंकली.

मी अडाणी..अन् झालो कॅबिनेट मंत्री, पठ्ठ्या राज्यमंत्री पदावरच खूश होता, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांची जबरदस्त फटकेबाजी!
रोजगार हमी योजना मंत्री व शिवसेना नेते संदीपान भूमरे
Follow us on

औरंगाबादः वैजापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात मातोश्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आढावा बैठकीसाठी आलेल्या रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे (Sandipan Bhumre) यांनी उपस्थितांसमोर अस्सल ग्रामीण भाषेत भाषण करून सर्वांची मनं जिंकली. यावेळी आपण कॅबिनेटमंत्रीपदी कसे पोहोचलो आणि तेथे गेल्यावर कोणत्या अडचणी आल्या याचे अनुभव मोठ्या विनोदी शैलीत कथन केले.

कामगार ते नामदार झालो, पण तसाच आहे!

वैजापूर येथील कार्यक्रमात बोलताना संदीपान भूमरे म्हणाले, मी अजूनही गावातल्या लोकांसाठी तसाच आहे. मी ज्या कारखान्यात कामगार होतो. नंतर त्याच कारखान्याचा चेअरमन झालो. त्यानंतर आमदार आणि आता नामदार झालो. मतदारसंघातील लोकांनी मला खूप प्रेम दिले. मी जो काही आज आहे, तो फक्त सामान्य माणसांमुळेच आहे, अशी शब्दात संदीपान भूमरे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी अजूनही गावाकडे गेल्यावर चहाच्या दुकानात जाऊन चहा पितो, पानटपरीच्या ठेल्यावर उभा राहून लोकांशी गप्पा झाडतो. या सगळ्या गोष्टीत मंत्रीपदामुळे काहीही बदल झालेले नाही, असं भूमरे म्हणाले.

पठ्ठ्या राज्यमंत्रीपदावरच खूश होता….

कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा कसा मिळाला, याचा किस्साही संदीपान भूमरेंनी सांगितला. ते म्हणाले, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मला पक्षश्रेष्ठींकडून फोन रात्री फोन आला. म्हणाले आम्ही तुम्हाला राज्यमंत्री करायचे ठरवले आहे. पठ्ठ्या यातच खूष होता. मलाही हीच अपेक्षा होती. परंतु त्याच दिवशी रात्री उशीरा पुन्हा फोन आला. तुम्हाला राज्यमंत्री नव्हे तर कॅबिनेट मंत्री करायचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर मी त्यांना कॅबिनेट नको तर राज्यमंत्रीच ठेवा, अशी विनंती केली. पण सांगूनही त्यांनी ऐकले नाही, असा किस्सा भूमरे यांनी सांगितल्यावर उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.

कॅबिनेटमंत्री झाल्यावर मोठी अडचणच झाली…

कॅबिनेट मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच आलेली मोठी अडचणही संदीपान भूमरे यांनी लोकांसमोर मोकळेपणाने बोलून दाखवली. ते म्हणाले, मंत्री झाल्यानंतर मातोश्री पाणंद रस्ते योजनेबाबत अध्यादेशात बदल करायचा असल्याने खासगी सचिवाने मला काहीतरी प्रश्न विचारला आणि मी बुचकाळ्यात पडलो. मी त्याला सरळ म्हणालो, मी अडाणी मंत्री आहे. मला बाकी ते काहीच कळत नाही. शेतकऱ्यांना जाण्यासाठी पक्का रस्ता तयार झाला पाहिजे अन् भरघोस निधी देता आला पाहिजे. असे सांगताच सचिवाने त्या पद्धतीने अध्यादेश तयार केला. असे अनेक किस्से संदीपान भूमरे यांनी सांगितले तेव्हा सभागृहात मोठमोठ्याने हशा पिकत होता.

इतर बातम्या-

Raj Thackeray: सगळेच हात धुवून घेतायत, ST सारख्या जुन्या संस्थेला पुढे आणण्यासाठी राज ठाकरेंनी सांगितला उपाय!

राहुल गांधींचा मुंबईतील मेळावा पुढे ढकलला; भाई जगतापांनी सांगितलं वेगळं कारण