बेपत्ता रॅपर राज मुंगासे अखेर समोर, अंडरग्राउंड का झाला होता? पहिल्यांदाच सांगितली आपबिती…
काही दिवसांपासून राज मुंगासे अज्ञातस्थळी निघून गेला होता. आज प्रथमच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत दिसून आला. त्यानंतर त्याने टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.
चेतन गायकवाड, नाशिक: खोके, चोर असे शब्द असलेलं रॅपसाँग केल्यामुळे सोशल मीडियावर मीडियावर लोकप्रिय ठरलेला रॅपर राज मुंगासे अखेर समोर आलाय. गेल्या काही दिवसांपासून राज मुंगासे बेपत्ता होता. त्याच्या रॅपसाँगमुळे राज मुंगासेविरोधात अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संभाजीनगर पोलिसांकडूनही त्याची विचारणा करण्यात आली होती. अखेर काही दिवसांपासून राज मुंगासे अज्ञातस्थळी निघून गेला होता. आज प्रथमच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत दिसून आला. त्यानंतर त्याने टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.
काय म्हणाला राज मुंगासे?
रॅपर राज मुंगासे याने आपण अंडरग्राउंड झालो होतो, अशी माहिती दिली. चोर आले.. ५० खोके घेऊन हे गाणं सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ते खूप लोकप्रिय ठरलं. जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर शेअर केल्याने ते आणखी व्हायरल झालं. पण एका महिलेने अंबरनाथ येथून माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली. माझ्यानंतर आणखी २ रॅपर्सवर कारवाई झाल्याचं कळलं… असं राज मुंगासे याने म्हटलंय..
पोलिसांकडून दबाव
राज मुंगासे याला नेमकी कोणत्या पोलिसांनी अटक केली होती, संभाजीनगर पोलिसांनी की मुंबई पोलिसांनी… यावरून संभ्रम निर्माण झाला होता. मात्र राज मुंगासे याने स्पष्ट केलं. तो म्हणाला, ‘ मला अटक झालीच नव्हती. संभाजीनगरहून पोलिसांचा कॉल आलेला. माझ्या भावाला तो कॉल आला होता. ते घरी गेले. व्हिडिओ डिलीट कर, माफीचा व्हिडिओ टाक, असा दबाव टाकत होते. पण मला माहिती होतं, मी चुकीचं बोललेलो नाहीये. तुम्ही पन्नास खोके घेतलेच नाहीत तर का ओढवून का घेताय?
मला व्हिडिओ डिलीट नव्हता करायचा म्हणून मी निघून गेलो… मी एफआयआर दाखल झाल्यानंतर साहेबांना (अंबादास दानवे) यांना व्हिडिओ पाठवला. साहेबांनी त्यांच्या वकिलांचा नंबर दिला. त्यांनी सहकार्य केलं. मी कुठे आहे, हे घरच्यांना माहिती नव्हतं. मला जामीनासाठी अर्ज करायचा होता. त्यामुळे आता मी समोर आलोय. २५ तारखेपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाला आहे. त्यानंतर पुढची कारवाई होईल… अशी आपबिती राज मुंगासे याने कथन केली आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
राज मुंगासे याला या प्रकरणात कायदेशीर मदत करण्यासाठी अंबादास दानवे यांनी मदत केली. ते म्हणाले, ‘ आमच्या संभाजीनगरचा आहे. तरुण मुलांना रॅपसाँगची आवड असते. खोके वगैरे.. त्याने शब्द वापरले. मी एफबीवर शेअर केलं. लोकांनी ते उचलून धरलं. अंबरनाथमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. एखाद्या तरुणाला भावना व्यक्त कराव्या वाटल्या तर गुन्हा काय दाखल केला… अख्खा महाराष्ट्र गद्दार म्हणतोय… याच्याविरोधात का गुन्हा दाखल करताय? लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रकार सुरु आहे.त्याच्यावर फार गंभीर गुन्हेच नाहीयेत. न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कोर्टाची आहे.. तिथे न्याय मिळेल..