Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: आधी औरंगजेबाची स्तुती, आता टीका, संजय गायकवाड यांची तीन महिन्यात पलटी; औरंगजेबाबद्दल काय म्हणाले होते?

जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर आणि हिंदू द्वेष्टा नव्हता असं म्हटलं तेव्हा गायकवाड यांनी आव्हाडांची कान उघाडणी केली होती. तसेच औरंगजेब कसा क्रूर होता हे समप्रमाण दाखवून दिलं होतं.

VIDEO: आधी औरंगजेबाची स्तुती, आता टीका, संजय गायकवाड यांची तीन महिन्यात पलटी; औरंगजेबाबद्दल काय म्हणाले होते?
संजय गायकवाड Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 8:22 AM

संदीप वानखेडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, औरंगाबाद: राज्यात सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब बादशाहा हा क्रूर नव्हता. तसेच तो हिंदू द्वेष्टाही नव्हता असं विधान केलं आणि राजकीय ठिणग्या पडायला सुरुवात झाल्या. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला. त्यामुळे विरोधकांनी भाजपला घेरलं. या दोन्ही नेत्यांच्या विधानावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड मात्र चांगलेच संतापले होते. त्यांनी आव्हाड आणि बावनकुळे यांना आपल्या अंदाजात फटकारत औरंगजेब कसा क्रूर होता हे ठासून सांगितलं. पण आता स्वत: संजय गायकवाड यांचाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात ते औरंगजेबावर स्तुतीसुमनं उधळताना दिसत आहेत. तीन महिन्यापूर्वीचा हा व्हिडीओ आहे. त्यावरून गायकवाड यांनी तीन महिन्यातच पलटी मारल्याचं दिसून येत आहे.

आमदार संजय गायकवाड हे ऑक्टोबर 2022मध्ये बुलढाण्याच्या एका उर्दू शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जाहीरपणे ते औरंगजेबाची स्तुती करताना दिसत आहेत. औरंगजेब कसा कष्टाळू होता. शिवाजी महाराजांबद्दल त्याने कसं चांगलं विधान केलं होतं. हे सांगताना संजय गायकवाड दिसत आहेत. गायकवाड यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले गायकवाड?

या व्हिडीओत संजय गायकवाड औरंगजेबाची स्तुती करताना दिसत आहे. औरंगजेब बादशाह यांचं संपूर्ण देशात राज्य होतं. पण त्यांनी टोप्या शिवून आपल्या कबरीची व्यवस्था केली होती. त्यांनी राज्याचा खजिना घेतला नाही. माझ्या कबरीचा खर्च माझ्या स्वखर्चातूनच करण्यात यावा अशी औरंगजेबाची इच्छा होती. म्हणून त्यांनी टोप्या शिवून पैसा जमवला होता, असे गौरवोद्गार गायकवाड यांनी काढले.

शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. तेव्हा औरंगजेबाचे उद्गार होते, हे परवरदिगार, हे सबके मालिक, सर्वांचं रक्षण करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज येत आहे, असं म्हणतानाही गायकवाड दिसत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ऑक्टोबर 2022मधला म्हणजे तीन महिन्यांपूर्वीचा हा व्हिडीओ असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नंतर काय म्हणाले?

जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर आणि हिंदू द्वेष्टा नव्हता असं म्हटलं तेव्हा गायकवाड यांनी आव्हाडांची कान उघाडणी केली होती. तसेच औरंगजेब कसा क्रूर होता हे समप्रमाण दाखवून दिलं होतं. औरंगजेबाने अनेक वर्ष भारतावर राज्य केलं.

त्याने बापाला जेलमध्ये टाकलं. सर्व भावांचा खात्मा केला आणि गादी बळकावली. त्यानंतर त्याने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडण्याचं फर्मान सोडलं. विश्वात झालं नाही एवढं धर्मांतर औरंगजेबाने घडवून आणलं, असं सांगतानाच शरद पवार साहेब या तोडांना आवरा, असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं होतं.

बावनकुळेंना म्हणाले पुळका का येतो?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला होता. त्यावरूनही त्यांनी बावनकुळेंवर टीका केली होती. राज्यातील विविध पक्षाच्या नेत्यांना औरंगजेबाचा एवढा पुळका का येतो?

हे त्यांचे नातेवाईक लागून गेले की बापजादे होते? आपल्या महापुरुषाबद्दल वेगळे काही बोलायचं आणि ज्यांनी आपला बाप, भाऊ मारला त्याच्याबद्दल आपुलकी दाखवायची? अशी टीकाच त्यांनी बावनकुळेंवर केली होती.