Raj Thackeray Aurangabad : आम्ही अंगावर केसेस घ्यायलाही तयार, राज गर्जनेआधीच अमित ठाकरे यांचं मोठं विधान
Raj Thackeray Aurangabad : अमित ठाकरे यांनी आज सभा स्थळी जाऊन तयारीची पाहणी केली.
औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तिसरी सभा औरंगाबाद येथे उद्या 1 मे रोजी पार पडत आहे. या सभेची मनसेने (mns) जय्यत तयारी केली आहे. या सभेला गर्दीची मर्यादा घालण्यात आली असली तरी ही सभा विक्रमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (amit thackeray) यांनी आज सकाळीच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊ मैदानाची पाहणी केली. स्टेज कुठे बांधण्यात येणार आणि कसा बांधला जाणार याची सर्व माहिती त्यांनी घेतली. तसेच काम करणाऱ्या कामगारांशी चर्चाही केली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पण मोजकेच बोलले. सभेला आवाजाची मर्यादा घालण्यात आली आहे. हा मोठा अडथळा आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता? असं अमित ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, असं मोठं विधान अमित ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे उद्याची राज ठाकरे यांची सभा दणदणीत आणि खणखणीतच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पोलिसांनी सभेसाठी काही अटी घातल्या आहेत. त्यात आवाजाची मर्यादाही आहे. 50 ते 55 डेसिबलपर्यंत आवाज असावा असं पोलिसांनी म्हटलं आहे. हे पाळणं शक्य आहे का? असा सवाल अमित ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर तेवढं ठीक आहे. आम्ही केसेस घ्यायला तयार आहोत. तुम्हाला आधीही बोललो आहे, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.
सभा ऐतिहासिक होईल
काही पक्षप्रवेश होते आणि सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. मी समाधानी आहे. माझ्या सहीत सगळ्यांना राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता आहे. ही सभा ऐतिहासिक होईल एवढे नक्की, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं. बाकीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही. आमचे वरिष्ठ नेते बोलतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सेल्फी विथ अमित
अमित ठाकरे यांनी आज सभा स्थळी जाऊन तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सभेच्या अनुषंगाने काही सूचनाही दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांशी सेल्फीही काढला. नंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केलं.
राज्यभरातून लोक येणार
अमित ठाकरे सभेची पाहणी करत आहेत. ही सभा जोरदार होणार आहे. संपूर्ण राज्यातून लोकं येणार आहेत. ही सभा रेकॉर्ड ब्रेक होईल. मनसेची सभा देखणी व वेगळी असते. किती लोकं येतात ते बघू, पण सभा प्रचंड होईल. पोलीस त्यांचं काम करतील. आम्ही आमचं काम करू. आम्ही त्यांनी घातलेल्या शर्थीचं काटेकोरपणे पालन करणार. राज जी भूमिका पाळत असतात तशी ती अंमल बजावणी करतात, असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.
शिवसेनेचा गड राहिला नाही
शिवसेनेच्या पालिकेच्या कारभाराला शिवसेना कंटाळली आहे. आम्हाला देखील सभा यशस्वी करायची आहे. सभा शांततेत होईल. आम्ही कार्यकर्त्यांना शांततेत येण्यासाठी सांगितले आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड होता आता नाही, असा चिमटाही सरदेसाई यांनी काढला.