औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. तत्पूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करून वातावरणनिर्मिती केली जात आहे. या बॅनरवर जय श्रीरामचा नारा दिला आहे. तसेच राज ठाकरे यांना श्रीरामाची मूर्ती भेट देतानाचा फोटोदेखील लावण्यात आलेला आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागात मनसेने हे बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे (Maharashtra Navnirman Sena) हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणार का, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे मोठ्या नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबर रोजी औरंगाबादेत येत आहेत. या दरम्यान ते जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढवा घेतील.
दरम्यान आज 13 डिसेंबर रोजी राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत. येथे अनेक कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करतील. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या जंगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ते औरंगाबादकडे रवाना होतील. उद्या औरंगाबादमध्ये सकाळी 10 वाजता मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. त्यानंतर राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेतील.
राज ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. त्यात 14 डिसेंबर रोजी ते औरंगाबादेत येण्याचीही घोषणा करण्यात आली होती. तत्पुर्वीच शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मोठी खेळी करत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यामुळे आता मराठवाड्यातील मोर्चेबांधणी हे राज ठाकरे यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे.
इतर बातम्या-