चित्रा वाघ यांना मोठा धक्का, कोर्टाच्या ‘त्या’ एका निर्णयाने भविष्यातल्या अडचणी वाढणार?
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या भविष्यातील अडचणी वाढू शकतात अशी बातमी आज समोर आली आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई हायकोर्टाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे.
औरंगाबाद : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई हायकोर्टाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाकडे एक याचिका दाखल केलेली. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे हा चित्रा वाघ यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्याविरोधात चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले होते. याच आरोपांप्रकरणी मेहबूब शेख यांनी केलेल्या एका कृतीविरोधात चित्रा वाघ यांनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
मेहबूब शेख यांनी तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप चित्रा वाघ यांच्याकडून करण्यात आलेला. याच आरोपांप्रकरणी मेहबूब शेख यांनी 50 लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा केलेला. मेहबूब शेख यांच्या या दाव्याविरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केलेलं. त्यामुळे आता चित्रा वाघ नेमकं काय पाऊल उचलतात आणि कोर्टा या प्रकरणात काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्या विरोधात एका तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप केलेला. विशेष म्हणजे शेख यांच्या विरोधात या प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात 28 डिसेंबर 2020 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला. एका 29 वर्षीय तरुणीने शेख यांच्याविरोधात फिर्याद नोंदवली होती. मेहबूब शेख यांनी नोकरीचं आमिष दाखवून मुंबईला नेणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुंबईला नेण्याच्या नावानं घेऊन गेलं असताना कारमध्ये अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला होता. याशिवाय शेख यांना विरोध केला असतान तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.
संबंधित प्रकरणी चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्याविरोधात हल्लाबोल केलेला. वाघ यांनी पत्रकार परिषद घेत शेख यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण त्यानंतर वेगळंच काहीतरी घडलं. पीडित तरुणीने आरोपांपासून घुमजाव केला. त्यामुळे चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यानंतर मेहबूब शेख यांनी मुंबई हायकोर्टात चित्रा वाघ यांच्या विरोधात 50 लाखांचा अब्रूनुकसावनीचा दावा केला. या विरोधात चित्रा वाघ यांनी हायकोर्टात अपील केलेली. पण त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.