औरंगाबादः बड्या कंपन्यांनी उद्योगनगरी औरंगाबादमध्ये (Aurangabad Industry) गुंतवणूक करावी, या उद्देशाने नोव्हेंबर महिन्यात शहरात राष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे (National Investment Conference) आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14,15,16 जानेवारीला ही परिषद आयोजित करण्यात आली असून या वेळी बड्या उद्योगांच्या प्रतिनिधींना ऑरिक सिटीची सफर घडवून शहरातील शिक्षण, वैद्यकीय सुविधा, दळणवळण आदी सुविधांचीही माहिती दिली जाणार आहे.
औरंगाबादेत होऊ घातलेल्या राष्ट्रीय परिषदेत हार्ले डेव्हिडसन, रिलायन्स, टाटा, फिरोदिया, सुझुकी यांच्यासारख्या ख्यातनाम बड्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी ऑरिक सिटीची सफर घडवली जाईल. येत्या 15 दिवसांत या परिषदेची अंतिम रूपरेषा तयार होईल. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी शहराच्या दौऱ्यावर असताना उद्योग जगतातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी या परिषदेविषयी प्राथमिक चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद शहराची ओळख जागतिक पातळीवर ऑटोमोबाइल हब अशी आहे. वाहनांचे कारखाने तसेच सुट्या भागांचे अनेक कारखाने औरंगाबादेत आहेत. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या शेंद्रा, बिडकीन येथील डीएमआयसीत कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बड्या ऑटोमोबाइल कंपन्यांच्या संचालकांना या परिषदेच्या निमित्ताने शहरात आमंत्रित करून त्यांना डीएमआयसीतील उद्योगांसाठी पूरक असलेल्या पायाभूत सुविधा व शहरातील शैक्षणिक, वैद्यकीय सेवांसह इतर सुविधांबाबत माहिती देऊन गुंतवणुकीसाठी या कंपन्यांना आकर्षित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. हार्ले डेव्हिडसन, रिलायन्स, टाटा, फिरोदिया, सुझुकी, टीव्हीएस, ह्युंदाई, यामाहा, होंडासारख्या कंपन्यांच्या संचालकांना या परिषदेसाठी आमंत्रित केले जाणार आहे.
जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळांचे या संचालकांसमोर प्रमोशन केले जाईल. ड्रायपोर्ट, निर्यातीसाठीच्या सुविधा, होऊ घातलेल्या रस्ते, रेल्वे आणि विमानतळावरील सुविधांची माहितीही दिली जाईल. ऑरिक सिटीची सफर घडवून या ठिकाणच्या सुविधांची, विविध योजनांची माहितीही देण्यात येईल. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरसाठीही उद्योजकांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
अत्याधुनिक उपचार सुविधा असलेल्या औरंगाबादची मेडिकल टुरिझम डेस्टिनेशन म्हणूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. मुंबई-पुण्याप्रमाणे दर्जेदार मात्र किमी किमतीत उपचार येथे मिळत असल्याने परदेशातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. अवयवदान मोहिमेतही शहराचे नाव अग्रेसर आहे. हे मुद्देही गुंतवणूकदारांना पटवून सांगितले जातील.
इतर बातम्या-