NCP Amol Mitkari : राष्ट्रवादीत चाललंय काय? अमोल मिटकरींच्या ज्या वक्तव्याला जयंत पाटील, धनंजय मुंडेंची दिलखुलास दाद, त्यावर राष्ट्रवादीचाच नेता म्हणतो, माफी माग
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचेच नेते कोंडीत सापडले आहेत. लग्न समारंभातील कन्यादानाच्या विधीवर भाष्य करताना कन्या हा काय दान करण्याचा विधी असतो का, असं वक्तव्य करून अमोल मिटकरी चांगलेच वादात अडकले आहेत.
बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचेच नेते कोंडीत सापडले आहेत. लग्न समारंभातील कन्यादानाच्या विधीवर भाष्य करताना कन्या हा काय दान करण्याचा विधी असतो का, असं वक्तव्य करून अमोल मिटकरी चांगलेच वादात अडकले आहेत. सांगलीत ज्या ठिकाणी मिटकरींनी हे वक्तव्य केलं, तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि जयंत पाटीलदेखील (Jayant Patil) उपस्थित होते. विषय होता मनसे आणि हनुमान चालिसाचा. अमोल मिटकरी जोशात आले. भराभर हनुमान चालिसा म्हणून दाखवू लागले. त्यानंतर लगेच ते अन्य काही श्लोकांवर उतरले. त्यानंतर त्यांनी लग्नात म्हणल्या जाणाऱ्या श्लोकांचा उच्चार केला. यावेळी त्यांनी एका लग्नातला अनुभव सांगितला. मिटकरी म्हणाले, ‘त्या लग्नात गुरुजींनी श्लोक म्हटले. नवरा-नवरीचे हात हातात देत.. मम भार्या समर्पयामि.. असं म्हणाले आणि मी मित्राच्या कानात त्याचा अर्थ सांगितला. माझी पत्नी घेऊन जा.. अरे कधी सुधारणार… असं म्हटलो’. अमोल मिटकरी यांनी सांगितलेल्या या प्रसंगावर भर सभेत एकच हशा पिकला. पण या सर्व वक्तव्यावरून अमोल मिटकरी आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
जयंत पाटील, धनंजय मुंडेंची दाद
सांगलीत ज्या वेळी अमोल मिटकरींनी हे वक्तव्य केलं, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी त्याला दिलखुलास दाद दिली. अमोल मिटकरींनी हा विषय काढला तेव्हा जयंत पाटील खळखळून हसत होते. त्यानंतर मम भार्या समर्पयामि… हे वक्तव्य केल्यानंतर धनंजय मुंडेदेखील मिटकरींच्या भाषणावर लोटपोट झाले. मात्र मिटकरींच्या वक्तव्यावरील ही दिलखुलास प्रतिक्रिया आता या नेत्यांनाही अंगलट येऊ शकते, अशी चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका काय?
एकिकडे जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर खळखळून हसत प्रतिक्रिया दिली. मात्र बीडच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने मात्र यावर कठोर टीका केली आहे. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, परळीचे माजी नगराध्यक्ष बालाजी धर्माधिकारी यांनी यावर जहरी प्रतिक्रिया दिली आहे. मम भार्या समर्पयामि असा मंत्रच हिंदू धर्मात कधीच नसतो. पण अमोल मिटकरींना आमदारकीसाठी गवसलेले हे तंत्र असू शकते, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे. हिंदू धर्माची ही जाहीर खिल्ली असून मिटकरींनी माफी मागितलीच पाहिजे, अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे. बालाजी धर्माधिकारी हे धनंजय मुंडे यांचे जवळपास 22 वर्षांपासूनचे कार्यकर्ते आहेत. मात्र ब्राह्मण समाजावर त्यांचा रोष नाही, अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी फेसबुकवर दिली आहे. मात्र अमोल मिटकरी यांच्या मिमिक्रीकडे पाहून त्यांना हसण्याचा मोह आवरला नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांची बाजूही घेतली आहे. एकूणच बालाजी धर्माधिकारी यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून मिटकरींनी माफी मागितलीच पाहिजे, असा सूर त्यातून उमटत आहेत.
ब्राह्मण महासंघ अन् हिंदू संघटना आक्रमक
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर ब्राह्मण महासंघ आणि अनेक हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिंदू धर्मातील विधींचं ज्ञान नसताना अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या मिटकरींनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
सभेत हसले, पण नंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर सांगलीतल्या सभेत लोटपोट हसलेले धनंजय मुंडे यांनी आज सावध प्रतिक्रिया नोंदवली. अमोल मिटकरींचं ते वैयक्तिक मत असून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अशी नाहीये. त्यामुळे मिटकरींनी वैयक्तिकरित्या याविषयी स्पष्टीकरण द्यावं, अशी भूमिका घेतली.
इतर बातम्या-