Community Radio: मराठवाड्यातील लोकसंस्कृतीचा वारसा सांगणार रेडिओ देवगिरी, नव्या वर्षात औरंगाबादकरांच्या भेटीला
औरंगाबादेत लवकरच नव्या कम्युनिटी रेडिओला सुरुवात होतेय. रेडिओ देवगिरी- 91.2 वर महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीविषयक, लोकजागृतीचे कार्यक्रम ऐकायला मिळतील. एनजीओद्वारे चालवला जाणारा हा मराठवाड्यातील पहिलाच कम्युनिटी रेडिओ ठरेल.
औरंगाबादः लोकसंस्कृतीचा वारसा सांगणारा, वंचित बहुजन घटकासाठी हक्काचं व्यासपीठ ठरणारा असा रेडिओ देवगिरी-91.2 लवकरच सुरु होत आहे. एखाद्या स्वयंसेवी संस्थेने सुरु केलेले मराठवाड्यातील हे पहिलेच रेडिओ एफ एम असेल. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा ‘रेडिओ देवगिरी’ हा नवीन वर्षात औरंगाबादमधील रसिक श्रोत्यांच्या भेटीला येत आहे. शहरात एमजीएम विद्यापीठ, इग्नु विद्यापीठआनंतर आता देवगिरी रेडिओ हा तिसरा कम्युनिटी रेडिओ ठरेल.
अद्ययावत स्टुडिओ, उत्तम कार्यक्रमांची पर्वणी
रेडिओ देवगिरीसाठी रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्राच्या इमारतीत अद्ययावत स्टुडिओ उभारण्यात आला आहे. पूर्ण वेळ उद्घोषक, साउंड इंजिनिअर्ससह 8 जण स्वेच्छावृत्तीने येथे सेवा देतील, अशी माहिती आकाशवाणीचे निवृत्त ज्येष्ठ उद्घोषक आणि रेडिओ देवगिरीचे केंद्र संचालक लक्ष्मीकांत धोंड यांनी सांगितले. 2014 मध्येच या रेडिओसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे संस्थेने परवानगी मागितली होती. मात्र 2017 पर्यंत स्वयंसेवी संस्थांना अशा प्रकारची परवानगी देणे बंद झाले होते. 2017 नतंर या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि 2021 मध्ये देवगिरी रेडिओचे स्वप्न साकार झाले, अशी माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी दिली.
कोण-कोणते कार्यक्रम असणार?
देवगिरी रेडिओवर हिंदी, मराठी चित्रपट गीते, भक्ती संगीतासह स्वातंत्र्यसेनानी, शास्त्रज्ञांची ओळख, आरोग्यासाठी टिप्स, भारतीय संस्कृतीतील प्रतिकांविषयी माहिती यांचा समावेश असेल. तसेच सावित्रीबाई फुले एकात्म मंडळाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविणारे कार्यक्रम सादर केले जातील.
अॅपद्वारे जगभरात पोहोचणार
कम्युनिटी रेडिओ चालवण्यासाठी अनेक विभागांच्या परवानग्या लागतात. सध्या याची प्रक्षेपण चाचणी सुरु असून वायरलेस ऑपरेटिंग लायसन्स येताच, बहुदा महिना अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला या रेडिओचे कार्यक्रम ऑन एअर जातील. सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे म्हणणे येथे मांडण्याची संधी मिळेल. तसेच महत्त्वाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना येथे व्यासपीठ मिळेल, अशी आशा प्रकल्प प्रमुख डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सध्या रेडिओच्या कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग, मुलाखती घेणे सुरू असून रेडिओ 15 ते 17 किलोमीटरवर ऐकता येईल. तसेच याचे मोबाइल अॅपही तयार असून गूगल प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करून जगभरात हे कार्यक्रम कुठेही ऐकता येतील, अशी माहिती केंद्र संचालक लक्ष्मीकांत धोंड यांनी दिली.
इतर बातम्या-