घरगुती गणपती तयार करण्यासाठी यंदा विशेष टूल किट, पण पुढच्या वर्षी गणपतीचा साचा हवा, अशी नागरिकांची मागणी
किटमध्ये ओली शाडूची माती, गणपती रंगवण्यासाठी 10 रंगांच्या डब्या, गणेशाच्या मूर्तीचे कोरीव काम करण्यासाठीचे साहित्य आणि विशेष म्हणजे गणपती कसा तयार करायचा, हे शिकवणारी व्हिडिओ लिंकदेखील देण्यात आली आहे.
औरंगाबाद: पर्यावरणपूरक गणेशोत्सव (Ecofriendly Ganesh Festival) साजरा करण्यासाठी घरातच शाडूच्या मातीचे गणपती बनवण्याचा ट्रेंड काही वर्षांपासून दिसून येत आहे. आपल्या हाताने गणपती बनवण्याचा आनंद घरातली बच्चे कंपनी आणि वयस्कर लोकही घेताना दिसतात. गणपती तयार करायला शिकवणाऱ्या खास कार्यशाळाही शहरात ठिकठिकाणी आयोजित केल्या जातात. यंदा हा आनंद आणखी सहज उपलब्ध होण्यासाठी काही कलाकार व्यक्ती, संस्था तसेच कंपन्यांनी गणपती तयार करण्यासाठी विशेष टूल किट उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे गणपती तयार करणे आणखी सोपे झाले आहे.
गणपतीच्या टूल किटमध्ये काय आहे?
शाडूचे गणपती तयार करण्यासाठी दरवर्षी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यंदा मात्र कोरोना प्रादुर्भावापासून बचावासाठी थेट कार्यशाळेत जाणे टाळले जात आहे. त्यामुळेच घराबाहेर न पडताही शाडूच्या मातीचे गणपती तयार करण्यासाठी बाजारात टूल किट उपलब्ध झाले आहे. यात ओली शाडूची माती, गणपती रंगवण्यासाठी 10 रंगांच्या डब्या, गणेशाच्या मूर्तीचे कोरीव काम करण्यासाठीचे साहित्य आणि विशेष म्हणजे गणपती कसा तयार करायचा, हे शिकवणारी व्हिडिओ लिंकदेखील देण्यात आली आहे. त्यामुळे गणपती तयार करणे सोपे झाले आहे. शहरातील काही कलाकार मंडळी एकत्र येऊन त्यांनी असे टूल किट ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच अॅमेझॉनसारख्या वेबसाइटवरही असे किट खरेदीसाठी उपलब्ध आहे.
लोकांना गणपतीचा साचाच हवाय!
शहरातील गायत्री कुलकर्णी यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने यंदा हे टूल किट विक्रीस ठेवले आहे. यास ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे, हे विचारल्यास गायत्री म्हणतात, लोकांनी समाधानकारक प्रतिसाद दिला. शहरात बरेच किट विकले गेले. मात्र लोकांना व्हिडिओ लिंकवरून नव्हे तर साच्याद्वारे गणपती तयार करायचा आहे. तसेच आमचे किट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुरिअरचाही वेगळा खर्च येतोय. त्यामुळे या उत्पादनाला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी गणपतीचे साचे मिळावेत, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. ऑनलाइन साचेही उपलब्ध आहेत, मात्र त्याची किंमत ग्राहकांना परवडण्यासारखी नसते. त्यामुळे पुढील वर्षी अशा टूलकिटमध्ये आणखी काय सुधारणा होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तरीही व्हिडिओ लिंकद्वारे स्वहस्ते गणपतीची मूर्ती जास्तीत जास्त लोकांनी तयार करावी, असे आवाहन गायत्री यांनी केले आहे.
यंदा मिरवणूक न काढता जागेवरच विसर्जन
शहरातील गणेश महासंघाच्या उत्सव समितीची पत्रकार परिषद नुकतीच झाली. त्यात समितीचे अध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी सांगितले की, यावेळी गणेश उत्सव सामाजिक उपक्रमांद्वारे राबवला जाईल. 10 सप्टेंबरला श्रींची स्थापना, 13 व 14 सप्टेंबरला महालक्ष्मी देखावा ऑनलाइन स्पर्धा, 15 सप्टेंबरला वृक्षारोपण, 16 सप्टेंबरला कोव्हिड लसीकरण शिबीर, 18 सप्टेंबरला कोरोनात मयत झालेल्या पालकांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप तर 19 सप्टेंबरला श्री गणेश विसर्जन संस्थान गणपती येथेच जागेवरच केले जाईल.
इतर बातम्या-