Omicron: औरंगाबादची व्यक्ती मुंबईत ओमिक्रॉनग्रस्त, नातेवाईक क्वारंटाइन!
रविवारी राज्यातील ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये आणखी भर पडली असून यात औरंगाबादहून मुंबईत गेलेल्या नागरिकाचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवरऔरंगाबादमधील यंत्रणाही अलर्ट झाली असून हा रुग्ण औरंगाबादेत कुणाच्या संपर्कात आला होता, याचा शोध घेतला जात आहे.
औरंगाबादः महाराष्ट्रात रविवारी सहा नव्या ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांची भर पडली. यात औरंगाबादच्या एका रुग्णाचा समावेश आहे. हा रुग्ण सध्या मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात विलगीकरण कक्षा असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यकर्माच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. तसेच या रुग्णाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असून त्याची प्रकृती सध्या उत्तम आहे.
औरंगाबादेतील नातेवाईक क्वारंटाइन
सदर, रुग्ण इंग्लंडचा प्रवास करून औरंगाबादेत आला होता. मात्र मुंबईत गेल्यानंतर तो ओमिक्रॉनग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यानंतर मात्र औरंगाबादची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. सदर रुग्ण कोणत्या भागातील रहिवासी होता, त्याचा शोध घेऊन त्याच्या नातेवाईकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये सदर नातेवाईक क्वारंटाइन असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मराठवाड्यात कोरोनाची स्थिती काय?
मराठवाड्यातील कोरोनाचे थैमान काही प्रमाणात कमी झाले आहे. आठही जिल्ह्यात मिळून रविवारी 12 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे आठही जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यू कोरोनामुळे झाला नाही. ओमिक्रॉनच्या धर्तीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विदेशी नागरिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबादेत 10 च्या सरासरीने रुग्णसंख्या वाढत असून लातूर, परभणी जालना, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यांत कोरोनाचे प्रमाण कमी आहे.
भारतात 153 ओमिक्रॉनग्रस्त
महाराष्ट्रात रविवारी 6 जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यातील चार जण मुंबईतील आहेत. गुजरातमध्ये चार बाधित आढळून आले. त्यामुळे रविवारी देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 153 वर पोहोचली. दिल्लीत मात्र कोरोनाचे 107 नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 27 जूननंतर दिल्लीतील ही सर्वाधिक संख्या आहे.
इतर बातम्या-