भीषण अपघात, सळई घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला इंडिका धडकली, औरंगाबादमधील फुलंब्रीत अपघात, एक ठार
अंधार असल्यामुळे ट्रॅक्टरचा अंदाज कारचालकाला आलाच नाही. त्यातच ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने भरधाव वेगाने येणारी इंडिका कार ट्रॅक्टरवर जाऊन आदळली.
औरंगाबादः सळई घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून इंडिका कार धडकल्याने कारचालक जागीच ठार झाला. हा अपघात (Accident) एवढा भीषण होता की कारचा पूर्ण चक्काचूर झाला. ही घटना गुरुवारी 11 ऑक्टोबर रोजी रात्री साडे सात वाजता फुलंब्री-खुलताबाद (Fulambri- Khultabad) रस्त्यावरील वारेगावजवळ घडली. या घटनेत सचिन तात्याराव चव्हाण या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
अंधारामुळे कार चालकाला दिसलेच नाही
फुलंब्रीहून सचिन चव्हाण हा युवर किनगावकडे इंडिका कारने जात होता. त्याच्यासमोर लोखंडी सळई घेऊन जाणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर चालला होता. अंधार असल्यामुळे ट्रॅक्टरचा अंदाज कारचालकाला आलाच नाही. त्यातच ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने भरधाव वेगाने येणारी इंडिका कार ट्रॅक्टरवर जाऊन आदळली.
रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित
अपघाताली माहिती मिळताच फुलंब्री पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण गायकवाड आणि सहकाऱ्यांनी सचिनला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत सचिन खुलताबाद येथे दुचाकी शोरूम चालवत होता. फुलंब्रीहून घरी जाताना हा अपघात घडला. याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
इतर बातम्या-