बातमी आनंदाची: मराठवाड्यातील उद्योजकांना अमेरिकेतून आमंत्रण, अमेरिकी दूतावासाची औरंगाबादेतील ‘मॅजिक’ला भेट
अमेरिकन दूतावासाच्या प्रतिनिधींनी मॅजिकच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण पाहून या टीमचे कौतुक केले. नव उद्योजक व महिला उद्योजकांसाठी अमेरिकेत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले.
औरंगाबाद: शहर आणि मराठवाड्यातील नवीन उद्योजकांना आता अमेरिकेचे प्रवेशद्वार खुले होण्याची संधी प्राप्त झाली आहे. औरंगाबादेतील ‘मॅजिक’ प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील तसेच देशातील नव उद्योजकांसाठी (New Start ups) प्रोत्साहन दिले जाते. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चरच्या (CMIA) माध्यमातून ‘मराठवाडा अॅक्सलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेटर कौंसिल’ची (MAGIC)ची स्थापना झालेली आहे. अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या टीमने औरंगाबादेतील (Aurangabad) मॅजिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. यावेळी ‘मॅजिक’चे कार्य पाहून त्यांनी मराठवाड्यातील नवउद्योजकांना अमेरिकेचे उद्योगद्वार खुले असेल, असे आश्वासन दिल्याची माहिती मॅजिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित औटी यांनी दिली.
अमेरिकन दूतावासातील प्रतिनिधींची भेट
CMIA अंतर्गत ‘मराठवाडा अॅक्सलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेटर कौंसिल अर्थात मॅजिकच्या माध्यमातून मराठवाड्यातील नव उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर वातावरण निर्मिती केली जाते. अमेरिकन दूतावासाच्या टीमने नुकतीच मॅजिकच्या कार्यालयाला भेट दिली. यात अमेरिकन कमर्शिअल सर्व्हिसेसच्या तज्ज्ञ शामली मेनन, सल्लागार नवीन वझीरानी यांचा समावेश होता. मॅजिकच्या वतीने संचालक सुरेश तोडकर, आशिष गर्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित औटी, इन्क्युबेशन व्यवस्थापन क्षितीच चौधरी, योगेश तावडे यांनी अमेरिकन टीमला येथील उपक्रमांची माहिती दिली. मॅजिकच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य, नवउद्योजक तसेच इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइलसह अन्य उद्योग क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळ निर्मिती सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच मॅजिकचा इतिहास, प्रवास, उपक्रमांचा झालेला परिणाम यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही अमेरिकन टीमशी संवाद साधला
निओ इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्, एलएलपी, आयपीआरो थ्री डी टेक्नोलॉजीज, ग्राउंड अप टेक्नोलॉजीज आणि यलोबॅग्जच्या प्रतिनिधींनी अमेरिकन टीमशी संवाद साधला. तसेच उद्योग क्षेत्रातील त्यांचे अनुभवदेखील कथन केले. यावेळी नवउद्योजकांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपापली उत्पादने या टीमला दाखवली.
नवउद्योजक व महिलांसाठी प्रवेशद्वारे खुली
अमेरिकन दूतावासाच्या प्रतिनिधींनी मॅजिकच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण पाहून या टीमचे कौतुक केले. नव उद्योजक व महिला उद्योजकांसाठी अमेरिकेत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले. अमेरिकेत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ग्लोबल पीच कार्यक्रम राबवला जातो. त्यात मॅजिकच्या स्टार्टअप्सना सहभागी होण्याचे निमंत्रण या टीमने दिले. औरंगाबादेतील नवउद्योजकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
‘मॅजिक’च्या उपक्रमांसाठी विविध संस्थांशी करार
‘मॅजिक’च्या उपक्रमासाठी जीआयझेड इंडिया, मराठवाडा अॅटो क्लस्टर, आयएसबीए, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, एसजीजीएसआयई अँड टी, नांदेड, एमआयटी औरंगाबाद, शासकीय अभियांत्रिकी, औरंगाबाद, आयजीटीआर, वाधवानी ग्रुप, सिपेट, निलिट, वाय सेंटर आदींनी सामंजस्य करार केले. संस्थेकडून राबवले जाणारे उपक्रम पाहून यूनएलटीडी, आयआयटी खरगपूर, केपीआयटी, हेडस्टार्ट, पुणे इंटरनॅशनल सेंटर, आयआयएम नागपूर, आयआयएम बेंगळुरू आदी संस्था सोबत आल्या. विविध सार्टअपकडून त्यांच्या नवसंकल्पना या उपक्रमाअंतर्गत मागवल्या जातात. त्यातून निवडलेल्या उद्योजकांना उद्योग सुरू करायचा असल्यास ‘मॅजिक’च्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी आवश्यक त्या कार्यशाळा, अभ्यासवर्ग, तज्ज्ञांच्या चर्चा घडवून आणल्या जातात.
इतर बातम्या-
Aurangabad: शाळांमध्ये किलबिलाट, काळजी अन् आनंदाची संमिश्र भावना, मराठवाड्यात काय आहे स्थिती?
ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार?, फडणवीसांनी राऊतांना डिवचलं