ईद-ए-मिलाद-उन्नबी निमित्त उद्या 19 ऑक्टोबरला औरंगाबादेत विविध कार्यक्रमांचे आयोजन, विद्युत रोषणाईने उजळले शहर
औरंगाबाद: ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त 19 ऑक्टोबर रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ऐतिहासिक दरवाजे तसेच रस्त्यांच्या बाजूला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील विविध भागांमध्ये (मुजाफीर) गोड भात तयार करून वितरित करण्यात येणार आहे. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. काय आहे ईद-ए-मिलाद-उन्नबी? इस्लाम धर्मात ईद-ए-मिलाद उन-नबी हा विशेष सण मानला जातो. […]
औरंगाबाद: ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त 19 ऑक्टोबर रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ऐतिहासिक दरवाजे तसेच रस्त्यांच्या बाजूला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील विविध भागांमध्ये (मुजाफीर) गोड भात तयार करून वितरित करण्यात येणार आहे. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे.
काय आहे ईद-ए-मिलाद-उन्नबी?
इस्लाम धर्मात ईद-ए-मिलाद उन-नबी हा विशेष सण मानला जातो. हा दिवस इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. इस्लामिक दिनदर्शिका- हिजरी नुसार हा दिवस रबी अल अव्वल महिन्याच्या 12 व्या दिवशी येतो. याला बारावफात असेही म्हटले जाते. येथे बारा चा अर्थ 12 आणि वफात म्हणजे इंतकाल (निधन) असा होतो. याच दिवशी मोहम्मद पैगंबर यांचे निधनही झाले होते. अरबी भाषेत मौलिद शब्दाचा अर्थ जन्माशी निगडित आहे. मौलिद उन नबीचा अर्थ हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस असा होतो. या वर्षी मिलाद उन्नबी किंवा ईद-ए-मिलाद या वर्षी 19 ऑक्टोबरला साजरा केला जात आहे.
मुस्लिम भाविकांमध्ये उत्साह
ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त शहरात झेंडे, टोप्या, लायटिंग, बॅच आदींच्या खरेदीचा उत्साहही दिसून येत आहे. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त दरवर्षीच शहरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोनामुळे मागील वर्षी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम झाले नव्हते. मात्र यंदा कार्यक्रमांना परवानगी असल्याने समाजातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
विद्युत रोषणाईतून मानवतेचा संदेश
मानवतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने 8 दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोशन गेट, किराडपुरा, बायजीपुरा, सिटी चौक, बुढीलेन, शहागंज आदी भागांमध्ये तसेच रोशन गेट, कटकट गेट या ऐतिहासिक दरवाज्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली. मंगळवारी सकाळी विविध भागांमध्ये (मुजाफीर) गोड भात व सरबताचे वाटप करण्यात येणार असून युवा वर्ग त्याच्या तयारीला लागला आहे.
जमात-ए-इस्लामी हिंद यूथ विंगच्या वतीने कटकट गेट येथील जमात-ए-इस्लामी हिंद कार्यालय, टाऊन हॉल येथील लाल मशीद, पैठण गेट तसेच चिकलठाणा येथील बडी मशीद या चार ठिकाणी मंगळवारी सकाळी 10.30 ते संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड व डेंग्यूकाळात रुग्णांना रक्ताची गरज पाहता नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नियम पाळून उत्सव साजरा करा : आयोजकांचे आवाहन
ईदनिमित्त शहरात जुलूस-ए-मोहंमदी (सल.) काढण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. जुलूस समितीने यंदाही पोलिस प्रशासनाकडे त्यासाठी परवानगी मागितली होती. कोविडकाळात गर्दी होऊ नये म्हणून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी जुलूस निघणार नाही. नागरिकांनी नियमांचे पालन करत उत्साहात उत्सव साजरा करावा, असे आवाहन आयोजन समितीचे डॉ. शेख मुर्तूजा यांनी केले आहे.
इतर बातम्या-
Eid Milad-un-Nabi 2021 : ईद-ए-मिलादला जुलूस काढण्यास सशर्त परवानगी, काय काय आहेत अटी आणि नियम
Bank Holidays Alert: पुढच्या आठवड्यात विविध राज्यांमध्ये बँकांचे कामकाज सहा दिवस बंद राहणार