औरंदगाबादः जिल्ह्यातील लसीकरणाचे (Corona Vaccination) उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी नागरिकांना लसीकरणाची आणखी सक्ती केली आहे. ज्या लोकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पात्र असूनही लस घेण्यास दिरंगाई करताना आढळल्यास अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन 85 दिवस पूर्ण केले आहेत. मात्र दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांना दर 15 दिवसांनी 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. येत्या बुधवारपासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून या करावाईला सुरुवात होणार आहे.
– जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणखी सक्तीचे आदेश दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे महाविद्यालय, कोचिंग क्लासेसमधील ज्या शिक्षकांनी लसीचे डोस घेतले आहेत, त्या शिक्षकांनी महिन्यातून एकदा कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे.
– तसेच लसीचा डोस न घेतलेल्या शिक्षकांना आठवड्याला कोरोना चाचणी करणे बंधनकारक असेल.
– लसीकरणासाठी जिल्ह्यात मोबाइल व्हॅन पथकांची स्थापना करण्यात येणार आहे, हे पथक मागणीप्रमाणे घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करणार आहे.
– लसीकरण न झालेल्या प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही.
– विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा स्कॉलरशिपसाठी अर्ज भरायचा असल्यास, तत्पूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे की नाही, याची खात्री करावी.
– लसीकरण मोहिमेत बेफिकीरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागप्रमुखांनी तत्काळ कारवाई करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
इतर बातम्या-