औरंगाबाद रेल्वे स्टेशनसमोरचा पेट्रोलपंप अखेर हटवला, वक्फ बोर्डाचा विरोध प्रशासकांनी झुगारला
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे स्टेशन परिसरात वाहतुकीस अडथळा ठरत असलेला पेट्रोल पंप महापालिका प्रशासनाने अखेर पाडला.
औरंगाबादः गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे स्टेशन परिसरात वाहतुकीसाठी अडथळा ठरत असलेले पेट्रोल पंप महानगरपालिकेने अखेर पाडला. मंगळवारी अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई केली. तसेच येत्या दोन दिवसात या ठिकाणी डांबरीकरण करून वाहतुकीसाठी हा रस्ता खुला करण्यात येणार आहे.
वक्फबोर्डाचा कारवाईला विरोध
महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पेट्रोल पंपचालकाला बोलावून नोटिस दिली होती. मात्र त्याने आदेशाचे पालन केले नाही. मंगळवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार स्वतः पथकासोबत सकाळीच तेथे पोहोचले. कोणालाही न सांगता कारवाईला सुरुवात झाली. यावेळी वक्फ बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारवाईला विरोध केला. ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र महापालिकेने कारवाई सुरुच ठेवत जेसीबीच्या मदतीने पेट्रोल पंपाचे मशीन काढले. पेट्रोल पंपचालकाने जमिनीतील टँक काढून घ्यावेत, अन्यथा मनपा त्यावरच डांबरीकरण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
जागा नेमकी कुणाची?
जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद फैज म्हणतात, ही जागा वक्फ बोर्डाची असून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला पेट्रोल पंपासाठी 11 मार्च 1960 रोजी 75 रुपये महिना या दराने ती भाडेतत्त्वावर दिली होती. तत्कालीन मराठवाडा मुस्लिम वक्फ कमिटी औरंगाबाद अंतर्गत मराठवाडा मुस्लिम वक्फ कमिटीच्या अंतर्गत ही जागा येत होती. पेट्रोलपंप चालकाकडून बोर्डाला वार्षिक 23 हजार 800 रुपये भाडे मिळते.” महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहसंचालक ए बी देशमुख म्हणाले, महापालिकेने काही वर्षांपूर्वीच रेल्वेस्टेशन मशीद कमिटीला 20 लाख रुपये भूसंपादनाचा मोबदला दिला होता. मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दीड कोटी रुपये देण्यात आले. हा निधीही मनपा मशीद कमिटीलाच देणार आहे. पेट्रोल पंपाच्या जागेच्या पीआर कार्डवर मशीद कमिटीचे नाव आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाचा यात काहीही संबंध नाही.
इतर बातम्या-