साहित्य महामंडळाचे राम शेवाळकर पुरस्कार डॉ. यू.म. पठाण, मनोहर म्हैसाळकर यांना जाहीर, लवकरच पुरस्कार वितरण
कोरोनामुळे 2020-21 चा पुरस्कार संत साहित्याच्या अभ्यासकाला द्यावयाचा होता. त्यासाठी पुरस्कार निवड समितीने डॉ. यू.म. पठाण यांची तर 2021-2022 च्या साहित्य संस्थात्मक वाड्.मयीन कार्यकर्ता यासाठीचा पुरस्कार नागपूरचे मनोहर म्हैसाळकर यांना देण्याचे निश्चित केले.
औरंगाबादः संत वाड्.मयाचे गाढे अभ्यासक डॉ. यू.म. पठाण (Dr. Y.M Pathan) आणि वाड्.मयाच्या क्षेत्रात आयुष्यभर मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर म्हेसाळकर (Manohar Mhaisalkar) यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा यंदाचा प्राचार्य राम शेवाळकर पुरस्कार (Ram Shewalkar Award) जाहीर झाला आहे. आज गुरुवारी 28 ऑक्टोबर रोजी या दोन्ही पुरस्कारांची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबादेत केली. यावेळी साहित्य महामंडलाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे आणि कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे हे उपस्थित होते.
सलग दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर
प्राचार्य राम शेवाळकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नावाने दरवर्षी एक लाख रुपयांचा पुरस्कार प्रायोजित केला असून तो क्रमाक्रमाने श्रेष्ठ लेखक, कवी, भाषा अभ्यासक, अभ्यासू वक्ता, संत वाड्.मयाचे अभ्यासक व यासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला देण्यात यावा, अशी शेवाळकर कुटुंबियाची व मराठी साहित्य महामंडळाची भूमिका आहे. कोरोनामुळे 2020-21 चा पुरस्कार संत साहित्याच्या अभ्यासकाला द्यावयाचा होता. त्यासाठी पुरस्कार निवड समितीने डॉ. यू.म. पठाण यांची तर 2021-2022 च्या साहित्य संस्थात्मक वाड्.मयीन कार्यकर्ता यासाठीचा पुरस्कार नागपूरचे मनोहर म्हैसाळकर यांना देण्याचे निश्चित केले. लवकरच सत्कारमूर्तींच्या सोयीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
संत वाड्.मयाचे अभ्यासक डॉ. यू.म. पठाण यांचा गौरव
मराठी संत परंपरेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक म्हणून डॉ. यू. म. पठाण हे सर्वदूर ओळखले जातात. संत साहित्यावर त्यांचे जवळपास 20 ग्रंथ प्रकाशित असून एकूण ग्रंथसंपदा 40 च्या आसपास आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कारदेखील मिळाला आहे. आता चौथ्या राम शेवाळकर पुरस्कारासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेही त्यांचा गौरव केला आहे.
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर
पुरस्काराचे दुसरे मानकरी ठरलेले मनोहर म्हैसाळकर हे गेल्या दहा वर्षांपासून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष असून काही काळ ते अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचेही अध्यक्ष होते. 1982 पासून त्यांनी विदर्भ साहित्य संघाची धुरा अविरतपणे सांभाळली. आज विदर्भ साहित्य संघ म्हणजे मनोहर म्हैसाळकर असे समीकरणच बनले आहे. त्यामुळेच यंदाच्या पातव्या प्राचार्य राम शेवाळकर पुरस्कारासाठी निवड समितीने त्यांची एकमताने निवड केली आहे.
इतर बातम्या-