औरंगाबाद | घंटागाडी आणि सफाई कर्मचाऱ्यांना पगारवाढ, रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिला होता ‘कामबंद’चा इशारा
शहरातील कचरा गोळा करण्याचे काम पी गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केले जाते. रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात किमान वेतनाच्या मुद्द्यावर कामगार शक्ती संघटनेच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन केलं होतं.
औरंगाबादः शहरातील कचरा संकलन (Garbage collectors) करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ मिळण्यासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. शिवजयंतीच्या आधी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले होते. मात्र कर्मचाऱ्यांना हे आंदोलन काही दिवस मागे घेण्याची विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. काल महापालिकेच्या (Aurangabad municipal corporation) कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात आली. ज्या खासगी कंपनीच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलन केले जाते, त्या कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून सेवा ज्येष्ठतेनुसार 700 ते 1600 रुपयांपर्यंत पगारवाढ मिळेणार, असा निर्णय घेण्यात आला आहे. पगारवाढीचा हा लाभ शहरातील 1171 कर्मचाऱ्यांना होणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त सौरभ जोशी (Saurabh Joshi) यांनी दिली.
पगार वाढ दिली पण एक अट…
शहरातील कचरा गोळा करण्याचे काम पी गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केले जाते. रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात किमान वेतनाच्या मुद्द्यावर कामगार शक्ती संघटनेच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन केलं होतं. मात्र शिवजयंती झाल्यावर या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल, असं आश्वासन त्यांना प्रशासनाने दिले होते. त्यानुसा, सोमवारी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, आमदार अंबादास दानवे, कंपनीचे मुरलीधर रेड्डी, सत्तार भाई, कामगार शक्ती संघटनेचे गौतम खरात, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त सौरभ जोशी यांची उपस्थिती होती. या बैठकीत रेड्डी कंपनीने कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार, 700 ते 1600 रुपयांपर्यंत पगारवाढ दिली. मात्र यासाठी एक अट घालण्यात आली. कचरा जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भंगार वेगळे करून विकता कामा नये, असे सांगण्यात आले आहे.
किमान वेतन कायद्यानुसार पगारवाढीचे काय?
दरम्यान, किमान वेतन कायद्यानुसार, 18 ते 22 हजारांपर्यंत पगारवाढ करण्याची मागणी कामगार संघटनेची होती. परंतु एवढी पगारवाढ दिली तर सर्व खर्च पगारावरच होऊन कंपनीचे दिवाळे निघेल, अशी भूमिका कंपनी प्रतिनिधींनी मांडली. चर्चेअंती एक वर्षापासून कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना 700 रुपये, दोन वर्षांपासून कामावर असलेल्यांना 1100 रुपये तर तीन वर्षांपासून कामावर असलेल्यांना 1600 रुपये पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर बातम्या-