राजे आयाबहिणींनाही सोडलं नाही हो… जखमी आंदोलकांचा फुटला बांध; संभाजीराजे म्हणाले, महिलांच्या साडीवर रक्त

| Updated on: Sep 02, 2023 | 11:36 AM

जालन्याच्या घटनेवरून छत्रपती संभाजीराजे चांगलेच संतापले आहेत. हे कसले राज्य आहे? एवढा अमानुष लाठीमार करतात का? कुणालाच सोडलं नाही, असा संतप्त सवाल संभाजीराजे यांनी केला आहे.

राजे आयाबहिणींनाही सोडलं नाही हो... जखमी आंदोलकांचा फुटला बांध; संभाजीराजे म्हणाले, महिलांच्या साडीवर रक्त
sambhaji raje
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालना | 2 सप्टेंबर 2023 : जालन्यात आरक्षणासाठी शिस्तबद्धरित्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. या लाठीहल्ल्यात अनेक आंदोलक जखमी झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. तर राजकीय वर्तुळातूनही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी पहाटे अडीच वाजताच जालन्यात जाऊन आंदोलकांची विचारपूस केली. तर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही जालन्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे.

संभाजीराजे यांनी आज सकाळीच अंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. संभाजीराजे आंदोलकांच्या घरी गेले. त्यांच्यासोबत जमिनीवर बसून त्यांच्याकडून विचारपूस केली. त्यांचं सांत्वन केलं. आम्ही तुमच्यासोबत आहोत. काहीच काळजी करू नका. सर्व नीट होईल, असा धीरही त्यांनी आंदोलकांना दिला.

कुणाचा तरी फोन आला आणि…

त्यानंतर संभाजी छत्रपती हे अंबड उपजिल्हा रुग्णालयात गेले. तिथे जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली. उपचाराची माहितीही घेतली. डॉक्टरांशी संवादही साधला. या आंदोलकांना रुग्णालयात येऊन भेटणारे संभाजीराजे हे पहिले नेते होते. थेट शिवरायाच्या वारसाने येऊन आपली विचारपूस केल्याने आंदोलकांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

हे सुद्धा वाचा

आम्हालाच मारलं. आमच्यावर गुन्हे देखील दाखल केले. सगळं नीट चालंल होतं. शेवटच्या पाच मिनिटात काय झालं माहीत नाही. आमच्यावर लाठीमार सुरू करण्यात आला. कुणाचा तरी फोन आला आणि त्यानंतर अॅक्शन सुरू झाली, असं हे जखमी आंदोलक सांगत होते.

घरात घुसून घुसून मारलं हो

राजे लय बेदम मारहाण केली आम्हाला. घरात घुसून घुसून मारलं राजे आम्हाला. राजे आमच्या आया बहिणीलाही सोडलं नाही हो, असं सांगताना एका आंदोलकाचा अश्रूचा बांध फुटला. या आंदोलकांना रडताना पाहून संभाजीराजेही काही वेळ स्तब्ध झाले.

महाराष्ट्राला शोभत नाही

त्यानंतर संभाजीराजे यांनी मीडियाशी संवाद साधला. कशा पद्धतीने लाठीचार्ज झाला, कशा पद्धतीने फायरींग झालं हे जखमींनी सांगितलं. अनेक लोकांना छर्रे लागले. पुरुष पोलीस वयस्क महिलांना मारत होते. महिलांच्या साडीवर रक्त होत, महाराष्ट्राला हे शोभत नाही, असा संताप संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

हे कसलं राज्य?

हे कसलं राज्य हे त्यांनी सांगावं. ज्यांनी हे केल त्यांच्यावर कारवाई करा. केंद्रात राज्यात तुमचं सरकार आहे. मराठ्यांना सामाजिक मागास सिद्ध करा, आरक्षण मिळवून द्या. मी आज राजकीय बोलणार नाही. पण जे झालं ते निंदनीय, असंही ते म्हणाले.