दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 15 ऑक्टोबर 2023 : संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व प्रवासी बुलढाण्याहून सैलानी बाबांचं दर्शन घेऊन येत होते. मध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघातात 23 प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एका 11 वर्षाच्या लहान मुलाने या अपघाताची माहिती दिली आहे. हा मुलगा या बसमधून प्रवास करत होता. त्याचा भाऊ आणि आईवडील त्याच्यासोबत होते. साधारण रात्री 12.30 नंतर हा अपघात झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. आमची बस चालली होती. आमच्यामागे ट्रक होता. ट्रकच्या मागे एक आरटीओची गाडी येत होती. ही आरटीओची गाडी ट्रकचा पिच्छा करत होती.
त्यानंतर ट्रकने वेग वाढवला आणि आमच्या बसला ओव्हरटेक केलं. ट्रक पुढे गेला. त्यानंतर आरटीओची जीपही पुढे गेली. हा प्रकार माझ्या भावाने मला दाखवला. पण पुढच्याचवेळी आणखी एक जीप थेट ट्रकच्यासमोर आडवी झाली. त्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबला आणि ट्रक गचकन थांबली. ट्रक थांबताच आमची पाठीमागून येणारी बस थेट या ट्रकवर जाऊन आदळली आणि अपघात झाला, असं या मुलाने सांगितलं.
अपघात होताच आम्ही जागेवरून उडालो. काही लोक दुसऱ्या सीटवर आदळले. आमचे काही लोक जखमी झाले. आम्ही दरवाजाला लाथ मारली आणि बाहेर पडलो. नंतर जखमींना बाहेरून काढलं. या अपघातात काहींना गंभीर तर काहींना किरकोळ मार लागला असल्याचं या मुलानं सांगितलं. आरटीओची एक जीप बसचा पाठलाग करत होती. तर दुसरी जीप राँग साईडने आली आणि अपघात झाल्याचं हा मुलगा म्हणाला. आम्ही चिखलीला सैलानी बाबांच्या दर्शनाला गेलो होतो. सैलानी बाबांना चादर चढवली आणि साडेसातला तिथून निघालो होतो, असंही ते म्हणाला.
महामार्गाच्या अलिकडे आम्ही जेवून निघालो. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रकला अचानक हात दिला. त्यामुळे ट्रक थांबला आणि आमची गाडी वेगात होती अचानक ट्रकवर धडकली. ट्रकने अर्जंट ब्रेक मारला. त्यामुळे आमची गाडी ट्रकवर आदळली. त्यामुळेच हा अपघात झाला, असं रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका जखमीने सांगितलं.
नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्गा येथे दर्शनासाठी खासगी ट्रॅव्हल्स बस करून गेले होते. खासगी ब मध्ये एकूण 35 प्रवासी बस होते. सर्व प्रवासी बुलढाण्याहून नाशिककडे जात होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर वैजापूर जांबरगाव शिवारात असलेल्या टोलनाक्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकला तपासणी करण्यासाठी थांबवलं. त्यावेळी हा अपघात झाला. हा अपघात प्रचंड भीषण होता. अपघातात ट्रॅव्हल्स बसचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. यात चार वर्षाचा मुलाचा देखील समावेश आहे.
1) दगू सुखदेव म्हस्के
2) गौतम भास्कर तपासे
3) कार्तिक नावाचा लहान मुलगा
4) शांताबाई नामदेव मस्के
5) दुर्गा लहान मुलगी
6) धनश्री लखन सोळसे
7) लखन शंकर सोळसे
8) सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन
9) श्रीहरी दीपक केकाने
10) सम्राट दीपक केकाने
11) संदेश संदीप अस्वले
12) अनिल साबळे
13) प्रकाश हरी गांगुर्डे
14) तन्मय लक्ष्मण कांबळे
15) संदीप रघुनाथ अस्वले
16) युवराज विलास साबळे
17) गिरजेश्वरी संदीप अस्वले
18) पूजा संदीप अस्वले
19) वैशाली संदीप अस्वले
20) ज्योती दीपक केकडे