उद्धव ठाकरे आणि माजी पोलीस आयुक्तांमध्ये मोठी डील, Sanjay Shirsat यांच्या दाव्याने खळबळ; चौकशीची मागणी
रावण दहन कधी करायचं यासाठी मुहूर्त काढावा का? दृष्ट प्रवृत्ती जाळणे हा उद्देश आहे. रावणाबद्दल कुणाला प्रेम असेल आणि कुणी आंदोलन करत असेल तर स्वागत आहे, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली.
दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, औरंगाबाद | 21 ऑक्टोबर 2023 : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. दोघांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही. मात्र माजी पोलीस आयुक्तांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीवरून शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संजय पांडे गँगस्टर आहे. महाविकास आघाडीच्या काळात यांचा गोंधळ आपण पहिला आहे. ते मातोश्रीवर येतात म्हणजे ते गुन्हेगारी संबंध उघड करतील अथवा त्यांना काहीतरी पाहिजे असेल, असे मला कळते. त्यांची गुपित यांनी उघड करू नये म्हणून उद्धव गट त्यांना लोकसभा तिकीट देणार आहे. ही मोठी डील आहे. याचा तपास केला पाहिजे. त्यांच्यात सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.
रावण एक दिवस आधी जाळला तर काय फरक पडतो?
दसरा मेळावा हा ठरल्याप्रमाणे शिवाजी पार्कवर होणार होता. मात्र दोन गटात भांडण नको म्हणून आझाद मैदान मुख्यमंत्र्यांनी निवडले. रामलीलांच्या आयोजकांना एक दिवस अगोदर रावण दहन करायला सांगितलं. शिंदे साहेब त्यांच्यासोबत बोलले असतील. त्यानंतर निर्णय घेतला असेल. आता काही लोक विरोध करत आहेत. त्यांना आता राम आठवला. रामाने त्यांना सुबुद्धी दिली, संजय राऊत म्हणतात आता वाल्याचा वाल्मिकी नवीन रामायण लिहतोय. अहो. ही टीका मुख्यमंत्र्यांवर नाही तर बाळसाहेबांवर आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब यांच्या मुशीत वाढले आहेत. रावण एक दिवस आधी जाळला तर काय फरक पडतो? राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.
हप्ते कुणाकुणाला मिळाले?
ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. ललित बरोबर कोण कोण जोडले होते याचीही चौकशी करा. ललित स्पष्ट सांगतोय की, मी पळालो नाही. मला पळवले आहे. त्याने कुणकुणाला हफ्ते दिले याचीही माहिती पोलिसांना आहे. हफत्यांशीवाय काम होत नाही. त्याचे लागेबांधे राजकीय आणि पोलीस सगळ्यांसोबत असतील, असं ते म्हणाले.
पुढाऱ्यांना हाकलू नका
मराठा आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन कुठल्या पक्षाचे नाही, जरांगे स्वतः कुठल्या पक्षाचे नाहीत. सर्व सामान्य लोक आंदोलनात आहेत. मात्र नेत्यांना गावबंदी सुरू करण्यात आली आहे. आंदोलन हिंसक करू नका असं जरांगे म्हणतात. मग राजकीय पुढाऱ्यांना गावातून हाकलणे सुरू आहे. ते योग्य नाही. मग ती अंत्ययात्रा असो वा अजून काही… नेत्यांना थांबू दिलं जात नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आहे. त्यावर तोडगा निघेल अशी आशा आहे.