औरंगाबादेत सप्टेंबरपासून संतपीठाची सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन, उदय सामंत यांची माहिती
राज्य सरकारने संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संतपीठाच्या इमारतीसाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी एक कोटी रुपये दिले आहेत.
औरंगाबाद : राज्य सरकारने संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संतपीठाच्या (Santpeeth) इमारतीसाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी एक कोटी रुपये दिले आहेत. या संतपीठाचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात येत्या सप्टेंबरपासून हे केंद्र सुरु होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) आज (30 जून) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना वरील माहिती दिली. (Santpeeth will start from September in Aurangabad inauguration will be held by the Chief Minister information said Uday Samant)
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संतपीठाचे उद्घाटन
“संतपीठ स्थापन करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढं टाकलं आहे. इमारतीसाठी सुभाष देसाई यांनी एक कोटी रुपये दिले आहेत. संतपीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून ते प्रत्यक्षात येत्या सप्टेंबरपासून सुरु होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी औरंगाबाद सारख्या ठिकाणी उपकेंद्र असावं अशी आमची भूमिका होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला आहे,” असे उदय सामंत म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी पुढच्या आठ दिवसांत याबाबत प्रगती करण्याचे आदेश दिले जातील असेही सांगितले.
विकास कामाला, महाविकास आघाडीला खीळ लावण्याचा प्रयत्न
राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींवरही उदय सामंत यांनी भाष्य केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबाआयमार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्या आशयाचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहलं आहे. अजित पवार तसेच परब यांच्यावर वसुलीचे आरोप असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकात पाटील यांच्या या दाव्यानंतर “अजित पवार आणि अनिल परब हे दोघेही मंत्रिमंडळात चांगलं काम करत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचं काम केलं आहे. विकास कामाला आणि महाविकास आघाडीला खीळ लावण्याचा हा प्रयत्न आहे,” असा आरोप उदय सामंत यांनी केला.
तसेच पुढे बोलताना विधानसभा अध्यक्षपदाची निवड आणि अधिवेशनचा कालावधी वाढवणे याबाबत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
इतर बातम्या :
लोकसभा आणि राज्यसभेच्या किती खासदारांनी कोरोना लस घेतली? एकही डोस न घेतलेले किती खासदार?
अण्णाभाऊ साठेंचे घाटकोपरमध्ये मोठे स्मारक, लवकरच कामाला सुरुवात होणार : जितेंद्र आव्हाड
(Santpeeth will start from September in Aurangabad inauguration will be held by the Chief Minister information said Uday Samant)