औरंगाबादः शहरातील पहिली ते पाचवीच्या शाळा 10 डिसेंबरनंतर सुरु होतील असा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन (omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात थैमान माजवलं आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा आता 1 डिसेंबरऐवजी 10 डिसेंबर रोजी सुरु होतील, असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
औरंगाबाद महापालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा येत्या 10 डिसेंबरपर्यंत बंदच राहतील. 10 तारखेनंतर शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याच्या वृत्तामुळे शहरातील पालकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी मुलांना स्कूल व्हॅनमधून शाळेत पाठवावे की नाही, किंवा मुलांना लसीकरणाशिवाय शाळेत पाठवावे की नाही, अशी चिंता पालकांना सतावत होती. त्यातच मागील चार दिवसात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट उभे राहिल्याने या चिंतेत अधिकच भर पडली. शहरातील पाचवी ते दहावीच्या शाळा सुरु असून अद्याप त्या पुढे किती दिवस सुरु ठेवायच्या, यावर निर्णय झालेला नाही.
इतर बातम्या-