संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी शरद पवार यांची मोठी घोषणा; मस्साजोगमध्ये जाऊन साधला संवाद
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. त्यांनी देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, तिला बारामतीतील वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्याचे व कॉलेजपर्यंतचे शिक्षण देण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांनी कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आणि सरकारकडून मिळालेल्या मदतीचे बँकेत जतन करण्याचा सल्ला दिला. गावकऱ्यांनी पोलिसांच्या उदासीनतेबाबत तक्रार केली.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बीडच्या मस्साजोग येथे येऊन दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शरद पवार यांनी देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद साधून प्रकरण समजून घेतलं. यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केलं. मुलीला बारामतीच्या वसतिगृहात पाठवा, मी कॉलेजपर्यंतचं सर्व शिक्षण करतो, असं शरद पवार यांनी जाहीर केलं. तसेच देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही आम्ही घेतो, असंही सांगितलं.
शरद पवार हे आज बीडच्या मस्साजोग गावात आले होते. त्यांच्यासोबत खासदार निलेश लंके, बजरंग सोनावणे आणि माजी मंत्री राजेश टोपे होते. यावेळी शरद पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची विचारपूस केली. ही घटना कशी घडली? नेमकं काय घडलं होतं? याची माहिती घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या कर्मवीर वसतिगृहात शिक्षणासाठी यायला सांगितलं. तिथे 9 हजार मुली शिकत आहेत. तूही ये. तुझा कॉलेजपर्यंतचा शिक्षणाचा खर्च मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका, असं शरद पवार म्हणाले. तसेच देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही आम्ही घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी कुटुंबातील आणि गावातील लोकांनी शरद पवार यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला. संतोष देशमुख यांनी या गावाला 19 पुरस्कार मिळवून दिले होते. एवढ्या मोठ्या माणसाला मारून टाकलं. आमचं काय साहेब? आम्ही घाबरलोय, असं गावकरी म्हणाले. सरपंचाला मारणारे आरोपी आमच्या गावातील नाही. आमच्या गावातील लोग गुण्यागोविंदाने नांदतात. आमच्यात भांडण होत नाही. निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र असतो, असं गावकरी म्हणाले.
पैसे बँकेत ठेवा
सरकारने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचं गावकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितलं. त्यावर पैसे बँकेत ठेवा. सेव्हिंग करा. महिन्याला व्याज मिळेल याची व्यवस्था करा. मुलीच्या शिक्षणाची काळजी करू नका, आम्ही आहोत, असं पवार म्हणाले.
40 मिनिटे दखलच नाही
गावातील सरपंचाला मारहाण झाली तो व्हिडिओ आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. आरोपी त्या दिवशी आला. टोलनाक्यावर मागून गाडी आणली. बॅरिकेड लावले. मारहाण करत सरपंचाला बाजूला काढलं आणि दुसऱ्या गाडीत घेऊन गेले. आम्ही तक्रार करायला गेलो. तेव्हा 40 मिनिटं कुणी दखल घेतली नाही. पोलीस जागेवर नव्हते. सरपंचाची हत्या झाल्याचं कळलं त्यानंतर युवराजला बोलावून पोलिसांनी सह्या घेतल्या. पोलिसांनी आरोपींसोबत चहापाणी घेतलं, अशी तक्रारही त्यांनी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे. त्यासाठी निष्णांत वकील द्या. तसेच देशमुख कुटुंबीयांतील एकाला नोकरी द्या, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली.