Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार शनिवारी औरंगाबादेत, MGM विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करणार
औरंगाबादः एमजीएम विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन 1 जानेवारी रोजी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, एमजीएम विद्यापीठाचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ […]
औरंगाबादः एमजीएम विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन 1 जानेवारी रोजी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, एमजीएम विद्यापीठाचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी दिली आहे.
‘मराठवाड्यातील पहिले स्वायत्त खासगी विद्यापीठ’
एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सपकाळ यांनी सांगितले की, एमजीएम हे मराठवाड्यातील पहिले स्वयंअर्थसाहाय्यित खाजगी विद्यापीठ असून 2019 पासून कार्यान्वित झाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने एमजीएम विद्यापीठाला 2 (एफ) दर्जा दिलेला आहे. या विद्यापीठात बेसिक अँड अप्लाईड सायन्स, इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी, मॅनेजमेंट अँड कॉमर्स, परफॉर्मिंग आर्ट्स, सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज, एज्युकेशन या विद्याशाखांचे पदवी, पदव्यूत्तर पदवी, पदविका व प्रमाणपत्र तसेच पीएच.डी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या ध्येयासाठी हे विद्यापीठ मागील दोन वर्षांपासून मार्गक्रमण करत आहे.
सुसज्ज प्रशासकीय इमारत
विद्यापीठाचे संपूर्ण कामकाज केंद्रीकृत पद्धतीने व्हावे, या उद्देशाने एमजीएम विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीमध्ये प्रवेशापासून ते निकालापर्यंतच्या सर्व प्रक्रियेशी निगडीत संपूर्ण यंत्रणा आणि प्रशासकीय कामकाजाची व्यवस्था केलेली आहे. विद्यापीठ प्रशासनातील मुख्य घटक म्हणजे कुलगुरू, कुलसचिव, परिक्षा प्रमुख, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता तसेच अन्य अधिकाऱ्यांचे कार्यालयही याच इमारतीत असणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी सुसज्ज असे इन्क्युबेशन, इनोव्हेशन अँड रिसर्च सेंटर (आयआयआरसी) येथे असून त्यातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये अवगत करता येतात. एमजीएममध्ये या सर्व अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सोईसुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालये, तज्ञ प्राध्यापकवर्ग उपलब्ध आहेत. नव्या प्रशासकीय इमारतीमुळे एक केंद्रीकृत व्यवस्था निर्माण झाली असून त्याचा लाभ प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक सर्वांनाच होणार आहे.
रोजगाराभिमुख कौशल्यप्राप्तीसाठी विशेष अभ्यासक्रम
एमजीएम विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, जैवतंत्रज्ञान, संगणकशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन, फाईन आर्ट्स, नृत्यकला पत्रकारिता, फिल्म, फोटोग्राफी, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजकार्य, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र, भारतीय आणि परकीय भाषा, फायर इंजिनिअरिंग, शारीरिक शिक्षण आणि योग इत्यादी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महात्मा गांधीजींचे संपूर्ण विचार अभ्यासता यावे आणि अध्ययनासोबत पदवीही मिळावी, या हेतूने गांधीयन स्टडीज हा अभिनव अभ्यासक्रमही येथे आहे. तंत्रज्ञानातील सर्व रोजगाराभिमूख कौशल्ये विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यानच अवगत व्हावीत आणि कुशल मनुष्यबळ निर्मिती व्हावी, हा उद्देश समोर ठेवून एमजीएम विद्यापीठात युडीआयसीटी (यूनिवर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नालॉजी) स्थापन करण्यात आले आहे.
इतर बातम्या-