‘तुम्ही फक्त बापाच्या जीवावर जगताय, आमचा बाप काढू नका’, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
"खासदार इम्तियाज जलील यांच्यावर ते टीका करत नाही. आमच्यावर करतील, आम्ही सॉफ्ट टार्गेट आहोत. मी विचारलं गडाखकडून किती-किती खोके घेतले? उत्तर दिलं नाही. खोके घेणाऱ्यांनी दुसऱ्याला नाव ठेवू नये", असा घणाघात आता शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज महाविकास आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत भाजप आणि सध्याच्या शिवसेनेवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाप चोरी केला, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांच्या घणाघातावर आता शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बापाबद्दल जे बोलल्या ते विसरले. माझं सुषमाबाबत वक्तव्य टोचत असेल तर तिचा सन्मान करा. शिवसेना प्रमुख फक्त तुमचे वडील नव्हते ते देशाचे होते. आमचा दिनक्रम आजही सहेबांच्या नावाने होतो. आम्ही काही चोरलं नाही. तुम्हाला लोकं जोडे मारतील. तुम्ही बाळासाहेबांच्या नावाचा व्यापार कराल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला डुबवणार. माझा शब्द लक्षात ठेवा. तुम्ही घरात बसले आणि त्यावेळी आम्हालाही घरात बसवलं. आम्हाला नामशेष करण्याची भाषा बोलतात तुम्हाला शुभेच्छा”, असा घणाघात शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला.
“उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे ठेवणीतील टोमणे होते. तेच तेच भाषण करायचं असेल तर कॅसेट टाकावी. अडीच वर्षात काय झालं सांगायला वाक्य नाही. इस्राईलमध्ये काय झालं सांगतात? खोटं बोलायची लिमिट असते. ही वज्रमूठ नाही बोगसमूठ आहे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केला.
‘सभेत ना जोश होता ना रस’
“खासदार इम्तियाज जलील यांच्यावर ते टीका करत नाही. आमच्यावर करतील, आम्ही सॉफ्ट टार्गेट आहोत. मी विचारलं गडाखकडून किती-किती खोके घेतले? उत्तर दिलं नाही. खोके घेणाऱ्यांनी दुसऱ्याला नाव ठेवू नये. लक्षात ठेवा आता आमची कातडी सोलाल तर आता आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही फक्त बापाच्या जीवावर जगताय, आमचा बाप काढू नका. शोभतं का तुम्हाला? तुम्ही मोठे नेते आहात ना?”, असा सवाल त्यांनी केला.
“सभेत ना जोश होता ना रस, खुर्च्या सुद्धा खाली होत्या. उद्धव भाषण करताय, अजित दादा मोबाईल पाहताय, अशोक चव्हान तिसरे काही तरी करताय ही कसली सभा, आता लोकांना या भाषणाचा कंटाळा येईल. ही सभा बाळासाहेब यांचा अपमान होती. तो येडा संजय राऊत म्हणतो यांना तुम्ही पंतप्रधान उमेदवार आहेत आणि तुमच्या सभेला नेते कोण, एकही राष्ट्रीय नाही. अजूनही सांगताय संभाजीनगर आम्ही केलं आता काय म्हणावं? ज्यांना प्रशासन कळत नाही त्यांना काय बोलावे?”, असे सवाल त्यांनी केले.