डागडुजीनंतर औरंगाबादमधील सिद्धार्थ जलतरण तलाव सज्ज, राज्य शासनाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत
गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेला महापालिकेचा सिद्धार्थ जलतरण तलाव अद्याप सुरु झालेला नाही. काही महिन्यांपूर्वी डागडुजी झाल्यानंतर आता तलाव सज्ज झाला आहे. मात्र राज्य शासनाने तलाव सुरु करण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही.
औरंगाबादः कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही महिन्यांपासून घट झालेली दिसून आल्यामुळे बहुतांश ठिकाणचे व्यवहार सुरळीत करण्यात आले आहेत. औरंगाबादमधील बाजारपेठा, शाळा, कॉलेजही बहुतांश प्रमाणात सुरू झाले आहेत. विविध पर्यटन स्थळही पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेला महापालिकेचा सिद्धार्थ जलतरण तलाव (Siddharth Swimming Pool) अद्याप सुरु झालेला नाही. काही महिन्यांपूर्वी डागडुजी झाल्यानंतर आता तलाव सज्ज झाला आहे. मात्र राज्य शासनाने तलाव सुरु करण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही.
1994 पासूनचे बांधकाम
शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानातील हा जलतरण तलाव 1994 पासून सुरु करण्यात आला. 21 बाय 50 मीटरच्या या तलावात 40 लाख लीटर पाणी मावते. त्यावेळी ऑलिंपिकच्या नियमांनुसार हा तलाव तयार करण्यात आला होता. मात्र गेल्या काही वर्षात सततच्या वापरामुळे तलावाचे काँक्रीट, टाइल्सची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. तलावाला तडेही गेले होते. त्यामुळे या तलावातील जलतरण बंद करण्यात आले होते.
2019 पासून तलाव बंद
एप्रिल 2019 पासून हा तलाव पाणीटंचाईमुळे बंद करण्यात आला होता. त्यानंतर तलावाची डागडुजी सुरु होती. या दुरुस्ती कामासाठी सुमारे 70 लाख रुपये खर्च करण्यात आले . त्यानंतर तलावातील पाण्याची गळती बंद झाली. तसेच काही बांधकाम आणि रंगरंगोटीही करण्यात आली. काही दिवसांपूर्वी तलाव जलतरणासाठी सज्ज करण्यात आला. मात्र अद्याप राज्य शासनाने तो सुरु करण्यासाठी परवानगी दिलेली नाही.
ऑफ सिझनमध्येही चांगला प्रतिसाद
सिद्धार्थ उद्यानातील या जलतरण तलावासाठी फेब्रुवारी ते जून हा सीझन असतो. तर जुलै ते जानेवारी हा कालावधी ऑफ सीझन असतो. सिद्धार्थ जलतरण तलावात दररोज पोहणाऱ्यांची संख्या नेहमीच जास्त असते. उन्हाळ्यात तर येथे तुफान गर्दी असतके. अगदी ऑफ सीझनमध्ये पोहणाऱ्यांची संख्याही चारशेपर्यंत जाते. त्यामुळे राज्यातील काही शहरांमध्ये प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव सुरु करण्यात आले असल्याने औरंगाबादमधील तलावही सुरु व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
इतर बातम्या-
औरंगाबादकरांनो खबरदार! पॉझिटिव्ह आलेले गर्दीत फिरून गेले, मास्क टाळू नका! तुम्हीही संपर्कात येऊ शकता
Aurangabad: ढासळलेल्या मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनासाठी नव्याने निविदा, 38 लाख रुपये खर्च करणार