अहो दसरा आलाय…जावयासाठी खऱ्या सोन्याची पानंही आलीत अन् सोनेही स्वस्त.. वाचा औरंगाबादचे भाव
आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे (जीएसटीसह) 44,970 रुपये प्रति तोळा असे आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा (जीएसटीसह) 48,800 रुपये एवढे नोंदवले गेले.
औरंगाबाद: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेकांना देण्याची प्रथा आहे. मात्र अनेक कुटुंबांमध्ये जावयांना खऱ्या सोन्याची किंवा चांदीची आपट्याची पानं देण्याची प्रथा असते. विशेषतः मुलीचे लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी जावयाला सोन्याचे किंवा चांदीचे (Gold for Son in Law) आपट्याचे पान देण्याची प्रथा महाराष्ट्रात विविध ठिकाणी पहायला मिळते. त्यानुसार सराफा बाजारातही सध्या सोन्या-चांदीची (Gold And Silver rate) आपट्याची पानं आलेली दिसत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात फारशी वाढ होतानाही दिसत नाही. आज म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारात (Aurangabad Sarafa Market) सोन्याचे भाव काहीसे घसरलेले दिसले. आज महाराष्ट्र बंद असला तरीही शहरातील सराफा बाजारपेठ मात्र सुरळीत सुरु आहे.
औरंगाबाद शहरातील भाव काय?
औरंगाबादच्या सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे (जीएसटीसह) 44,970 रुपये प्रति तोळा असे आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा (जीएसटीसह) 48,800 रुपये एवढे नोंदवले गेले. सोन्याच्या दराप्रमाणे चांदीच्या दरातही काहीशी घट झालेली पहायला मिळाली. एक किलो शुद्ध चांदीचे दर 64,000 रुपये एवढे नोंदवले गेल्याची माहिती त्रिमूर्ती चौकातील प्रसिद्ध सराफा व्यापारी दत्ता सराफ यांनी दिली.
जावयासाठी खास आपट्याची पानं
विजयदशमीच्या मुहूर्तावर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील काही घरांमध्ये जावयाला सोन्या-चांदीची पानं देण्याची प्रथा आहे. त्यानिमित्त औरंगाबादमधील सराफा बाजारात विविध आकारातील तसेच वजनानुसार सोने आणि चांदीची आपट्याची पानं विक्रीसाठी आली आहेत. नवरात्रीदरम्यान जास्तीत जास्त शुद्ध सोनं विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र दसऱ्याच्या दोन दिवस आधी ही खास आपट्याची पानं खरेदी करणारा ग्राहक वर्गही दिसतोच.
महाराष्ट्र बंद, पण सराफा बाजार सुरुच!
लखीमपूर येथील शेतकरी हत्येच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. मात्र औरंगाबादमधील सराफा बाजाराने या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात औरंगाबादमधील व्यापारी महासंघानेही या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार औरंगाबादमधील बहुतांश दुकाने सुरूच आहेत. सराफा बाजारातील सर्वच दुकाने सुरु आहेत. मात्र आज बंद दरम्यान राजकीय वातावरण तापलेले असू शकते, या चिंतेपायी ग्राहकांनी मात्र सराफा बाजाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दुकाने सुरु असली तरीही सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची म्हणावी तेवढी वर्दळ दिसून आली नाही.
दिवाळीपर्यंत सोनं 49 हजारांवर
सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो. पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.
इतर बातम्या-