मार्कांच्या घटत्या आलेखाचे टेंशन, मनात न्यूनगंड, औरंगाबादमध्ये तिने घेतला गळफास, गावात हळहळ!
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात नववीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मागील काही दिवसांपासून ऑनलाइन शिक्षण सुरु असल्याने आणि मार्कांमध्ये फार प्रगती नसल्याने ती चिंतेत होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
औरंगाबादः गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण, मार्कांचा घटता आलेख याचे टेंशन आल्यामुळे गंगापूर तालुक्यातील नववीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना (Aurangabad suicide) रविवारी उघडकीस आली. तनुजा उत्तम पाटेकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शैक्षणिक प्रगतीत समाधानकारक कामगिरी होत नसल्यामुळे ती सतत चिंतेत होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिल्याचे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले आहे.
तनुजा सर्वात मोठी मुलगी…
खादगाव येथील उत्तम पाटेकर हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने ते एका खासगी कंपनीत रोजंदारीने काम करत आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात. त्यांना चार मुली असून सर्वात मोठी मुलगी तनुजा ही इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती अभ्यासाच्या आणि मार्कांच्या चिंतेने ग्रस्त होती. कुटुंबियांशी फार बोलत नव्हती. तिच्या मनात न्यूनगंड तयार झाला असावा, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
रविवारी सकाळी गळफास उघडकीस
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तनुजा नेहमीप्रमाणे आजी-आजोबांसोबत एका खोलीत झोपी गेली होती. रविवारी सकाळी कुटुंबातील सदस्य उठल्यानंतर मागच्या घरात गेले असता तनुजा फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आरडा ओरड सुरु केली. ग्रामस्थ जमा झाले. सरपंचांना ही माहिती देण्यात आली. तनुजाला खाली काढून सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. तिथे डॉक्टरांनी तिवा मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात तिचा मृतदेह देण्यात आला.
इतर बातम्या-