परभणी : नागालँडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रितपणे सत्तेत सामील झाले आहेत. राष्ट्रवादीच्या या निर्णयाचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी सत्तेसाठी कोणताही निर्णय घेऊ शकते असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला कोंडीत पकडलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीसोबत युती केली म्हणून 40 आमदारांनी शिवसेना सोडली. मग आता नागालँडमध्ये भाजपने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ते 40 आमदार भाजपला सोडचिठ्ठी देणार का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सुषमा अंधारे काल परभणीत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत परळीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान अंधारे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. परळीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप पक्षाचे कार्यालय आहेत. मात्र भाजपच्या कार्यालयात कोणीही दिसून येत नाही असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.
नागालँडमध्ये भाजप राष्ट्रवादीसोबत गेली त्यामुळे आता आमचे चाळीस चुकार भाऊ भाजपपासून बाजूला जाणार का? आमचे 40 चुकार भाऊ इकडून गेले. जाताना त्यांनी सांगितले की, शिवसेना राष्ट्रवादीसोबत जात आहे, त्यामुळे हिंदुत्व धोक्यात आहे. राष्ट्रवादी आम्हाला नको होती म्हणून आम्ही बाहेर पडलो. तर आता प्रश्न पडतो की, नागालँड सरकारमध्ये राष्ट्रवादी आहे. तर भाजप बाहेर पडणार का? आणि भाजप बाहेर पडत नसेल तर याचा अर्थ आहे भाजप नकली हिंदुत्ववादी आहे? आणि जर भाजप नकली हिंदुत्ववादी आहे तर इकडचे चाळीस चुकार भाऊ भाजपपासून बाजूला जातील का? कारण भाजप आता राष्ट्रवादीसोबत गेलेली आहे. याच्यावरती त्यांना विचारलं पाहिजे, अशी प्रश्नांची सरबत्तीच सुषमा अंधारे यांनी केली.
सदानंद कदम यांच्या अटकेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली. खेडच्या सभेतील विराट उद्धव दर्शनाने भारतीय जनता पार्टीची उडालेली गाळण आणि शिंदे गटाची आदळआपट गेली चार दिवस चालू आहे. त्याची परिणीती म्हणून सूडबुद्धीच्या राजकारणाने डोकेवर काढले आणि आज रामदास कदम यांचे सख्खे भाऊ सदानंद कदम जे उद्धव ठाकरे यांचे कडवे समर्थक मानले जातात. त्यांच्यावर कारवाई केली आहे. सदानंद कदम यांची एक महत्त्वाची शस्त्रक्रिया पार पडलेली आहे आणि अशाही अवस्थेत सदानंद कदम यांच्यावर झालेली कारवाई निश्चितच निषेधार्ह आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.