धक्कादायक! औरंगाबादेत ऑनरकिलिंग? विहिरीत पडलेला मुलीचा देह मृत ठरून बापानेच परस्पर पुरल्याचा संशय
राधा बेपत्ता झाल्यावर, ती लगेच विहिरीत काय सापडते, तिला बाहेर काढल्यावर परस्पर मृत ठरवत तिला पुरण्याचा घाटही वडिलांनी एवढ्या घाईने का घातला, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या पुढील तपासात समोर येतील.

औरंगाबाद: वडिलांशी वाद झाल्यानंतर एक सतरा वर्षीय मुलगी घरातून निघून जाते, त्यानंतर काही तासात ती विहिरीत पडलेली आढळते, वडील आणि भाऊ तिला बाहेर काढतात, मुलगी मृत झाल्याचे ठरवत-नातेवाईकांना बाजूला सारत तिला विहिरीच्या शेजारीच पुरतात, हा धक्कादायक प्रकार काल 22 सप्टेंबर रोजी औरंगाबादमधील दौलताबाद परिसरात ही घटना घडली. राधाचा मृत्यू हा ऑनरकिलिंगचा (Honor Killing) प्रकार असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहराला (Suspected death of girl) हादरवून टाकले आहे. आपल्या मुलीला पुरून टाकण्यासाठी बापाचे हातच कसे धजावले, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस आज गुरुवारी पुढील तपास करतील.
काय घडलं चार दिवसांपूर्वी?
पोलिसांच्या चौकशीत समोर आलेला घटनाक्रम असा- राधा जारवाल असे या मुलीचे नाव असून चार दिवसांपूर्वी वडिलांशी काही कारणांवरून तिचे वाद झाले. राधा घरातून निघून गेली. काही तासांनी ती विहिरीत पडलेली दिसली. वडिलांनी भाऊ आणि इतर दोघांच्या मदतीने तिला बाहेर काढले. त्यानंतर ती जिवंत आहे की मृत, हे न पाहता मुलीला थेट विहिरीशेजारील जमिनीत पुरले. हे कृत्य करताना जमलेल्या सगळ्या नातेवाईकांना घरातील एका खोलीत बंद करून ठेवले. वडिलांनी आपला सन्मान जपण्यासाठी हे कृत्य केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.
पोलीस घरी पोहोचले तेव्हा…
22 सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी गावातीलच एका व्यक्तीने फोन करून या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती दिली. या माहितीनुसार, पोलीस जारवाल कुटुंबियांच्या घरी पोहोचले. परंतु कुटुंबातील कुणीही यासंबंधी बोलायला तयार नव्हते. जारवाल यांना तीन मुली आणि दोन मुले असल्याचे कळले. पण मोठी मुलगी राधा कुठे आहे, हे विचारताच कुटुंबातील सगळेच जण शांत बसले. मात्र पोलीसी खाक्या दाखवताच वडिलांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील एकेका सदस्याची विचारपूस सुरु केली.
लहान बहीण-भावंडांनी उलगडली घटना
राधा संध्याकाळी स्वयंपाक करत असताना वडिलांनी तिला मारले. ती घराबाहेर पडली. मात्र खूप वेळ झाला, ती दिसत नसल्याने वडिलांनी तिची शोधाशोध सुरु केली. अखेर शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. भाऊ आणि इतर दोघांच्या मदतीने वडिलांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला. राधा मृत झाल्याचे या सर्वांनी परस्परच ठरवले. पण घडल्या प्रकारामुळे सर्व नातेवाईक जमा झाले. राधाला खाटेवर ठेवत उरलेल्या कुटुंबियांना वडिलांनी एका खोलीत बंद केले. त्यानंतर तिला विहिरीजवळ पुरले, अशी माहिती प्राथमिक चौकशीअंती समोर येत आहे.
आज होणार उलगडा
दरम्यान, आज 23 सप्टेंबर रोजी राधाचा पुरलेला मृतदेह पोलीस बाहेर काढणार असून तो पुढे शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल. दरम्यान या प्रकरणी ऑनर किलिंग झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. राधा बेपत्ता झाल्यावर, ती लगेच विहिरीत काय सापडते, तिला बाहेर काढल्यावर परस्पर मृत ठरवत तिला पुरण्याचा घाटही वडिलांनी एवढ्या घाईने का घातला, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या पुढील तपासात समोर येतील.
इतर बातम्या-
Aurangabad Crime: मोबाइल दिला नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाला आला राग, नाराजीनं घरच सोडलं