देवीच्या रुपाने गोलंग्री शाळेत आल्या वनमालाताई, पदरचे 15 लाख खर्च करुन पालटले माहेरच्या शाळेचे रुप
कोरोनाकाळात सर्वत्र शाळा बंदच होत्या. ऑनलाइन वर्ग सुरू होते. मात्र, ग्रामीण भागात सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाइल असतीलच असे नाही त्यामुळे बावणे यांनी शाळा आपल्या दारी उपक्रम राबवला. इतर शिक्षकांनीही त्यांना साथ दिली.
बीडः माहेरच्या शाळेत शिक्षिका म्हणून बदली झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील वनमाला बावणे (Vanmala Bawane) यांना शाळेचे जीर्ण रुप पहावले नाही. एकानंतर एक उपक्रम राबवत त्यांनी शाळेच रुपच पालटून टाकायचे ठरवले. पाहता पाहता शाळेला अद्ययावत करण्यासाठी त्यांनी तब्बल 15 लाख रुपये खर्च केले आणि आज गोलंग्री (Golangri School) येथील ही शाळा डिजिटल सुविधांसह मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी तयार आहे. नवरात्रीच्या काळात गोलंग्रीच्या शाळेला देवीच्या रुपाने लाभलेल्या वनमालाताईंचे यासाठी अनेक व्यासपीठांवर कौतुक केले जात आहे.
माहेरच्या शाळेची दैन्यावस्था पहावली नाही अन्..
गोलंग्री माहेर असलेल्या वनमाला भागवत बावणे या जिल्हा परिषदेत शिक्षिका आहेत. 1996 ते 2012 या काळात त्यांनी बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथे, त्यानंतर 2013 ते 2018 या काळात नवगण राजुरी येथे ज्ञानदानाचे काम केले. त्यानंतर सन 2018 मध्ये त्यांची बदली झाली ती गोलंग्री गावात. गोलंग्री हे वनमाला यांचे माहेरचे गाव. माहेरच्या जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था, दोन जीर्ण खोल्यात शाळा, किचनशेडमध्ये भरावावे लागत असलेले वर्ग, शाळेच्या अंगणात कडब्याच्या गंजी, जनावरे बांधलेली, शेणामुळे जागोजागी अस्वच्छता अशी तेव्हा शाळेची स्थिती होती.
पतीच्या मदतीने शाळा विकासाचे काम हाती घेतले
वनमाला यांनी यापूर्वी नवगण राजुरीसारख्या आयएसओ शाळेत काम केले होते. त्यानंतर थेट अशा शाळेत काम करणे म्हणजे वनमाला यांच्यासाठी आव्हान होते. मात्र, त्यांनी हे आव्हान पेलले. पती भागवत बावणे यांच्या मदतीने त्यांनी शाळेचा विकास करण्याचे काम सुरू केले. पाचवीपर्यंतच्या या शाळेत सुमारे 65 मुले शिक्षण घेतात. शाळेच्या बांधकामासाठी शासनाकडून निधी येत नाही म्हणून त्यांनीच बांधकाम हाती घेतले. शाळेच्या 3 सुसज्ज खोल्या, संरक्षक भिंत, मैदानात पेव्हर ब्लॉक, रंगरंगोटी करून शाळा डिजिटल करण्यात बावणेंनी योगदान दिले. त्यांच्या या कामाची दखल घेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, आमदार संदीप क्षीरसागर यांनी कौतुक केले. विविध संस्थांनी त्यांचा पुरस्काराने गौरव केला.
कोरोनात शाळा आपल्या दारी उपक्रम
कोरोनाकाळात सर्वत्र शाळा बंदच होत्या. ऑनलाइन वर्ग सुरू होते. मात्र, ग्रामीण भागात सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाइल असतीलच असे नाही त्यामुळे बावणे यांनी शाळा आपल्या दारी उपक्रम राबवला. इतर शिक्षकांनीही त्यांना साथ दिली. यातून आठवड्यातील वार ठरवून घेत विद्यार्थ्यांच्या गल्लीत, परिसरात जाऊन त्यांना अध्यापन केले.
शिक्षकांनीही दिले योगदान
बावणे यांनी शाळेचे रुपडे पालटण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर त्यांना शाळेतील इतर शिक्षक सहकाऱ्यांनीही मदत केली. मुख्याध्यापक बी. बी. जाधव यांनी शाळेसाठी एलईडी टीव्ही भेट दिला तर, शिक्षक आर. एस. मुळे यांनी शाळेत बोअर आणि विद्युत पंप बसवून दिला.
इतर बातम्या-
औरंगाबादचा वाचनवेलू थेट जम्मूपर्यंत, ‘मोहल्ला बालवाचनालया’च्या 21 शाखा, जळगाव, पुण्यातही केंद्र