औरंगाबादः अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर आजपासून जमा होणार मदत, 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार भरपाई
औरंगाबादः यंदाच्या पावसाळ्यातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी (Heavy rain) झाली. या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 7 लाख 4 हजार 280 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांचे 5 लाख 24 हजार 655 हेक्टरावरील खरीप पीक पूर्णपणे बाधित झाले. या नुकसानीच्या (Crop loss) मदतीसाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याला 416 कोटी 54 लाख 61 हजार रुपयांचा निधी मिळाला […]
औरंगाबादः यंदाच्या पावसाळ्यातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी (Heavy rain) झाली. या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 7 लाख 4 हजार 280 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांचे 5 लाख 24 हजार 655 हेक्टरावरील खरीप पीक पूर्णपणे बाधित झाले. या नुकसानीच्या (Crop loss) मदतीसाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याला 416 कोटी 54 लाख 61 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. आजपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत जमा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
खरीपाची पिकं अन् जमिनीही खरवडून गेल्या
औरंगाबाद जिल्ह्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने तर हातातोंडाशी आलेले खरीपाचे पीक पूर्णपणे वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या तर अवघ्या जमिनीच खरडून निघाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त वाढीव मदत जाहीर केली. त्यातील 75 टक्के रक्कम जिल्ह्यांना वितरीतही केलीआहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्याला 416 कोटी 54 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालयांना गुरुवारी वितरीत करण्यात आला.
लाभार्थ्यांची यादीही वेगाने तयार
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. शुक्रवारपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. मात्र असे असले तरीही ज्या तालुक्यांनी लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे, तेथे आजपासूनच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, असे सूत्रांनी सांगितले.
सोयगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील अन्य एका घटनेत कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्र संपवली. तालुक्यातील वरठाण येथए ही घटना घडली. फैयाज खाँ रहेमान खाँ पठाण असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. फैयाज खाँ पठाण यांची जंगलीकोठा शिवारात दोन एकर शेती आहे. येथे त्यांनी कपाशीची लागवड केली होती. मात्र मागील माहिन्यातील अतिवृष्टीमुळे त्यांचे कपाशीचे पिक पूर्णपणे वाया गेले. शेतीसाठी लागलेला खर्चही निघणे कठीण होते. त्यांच्यावर जवळपास तीन लाख रुपये कर्ज, सोसायटीचे 23 हजार रुपये कर्ज होते. यातून प्रपंच कसा चालवायचा, या विवंचनेत असलेल्या पठाण यांनी रविवारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबियांनी बेशुद्धावस्थेत त्यांना पाचोरा येथे दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्यांना जळगावमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
इतर बातम्या-